November 11, 2024

पुण्यात २५ मार्चपासून सुरु होणार ३३वी राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धा

पुणे, दि. २१ मार्च २०२३ : भारतीय तलवारबाजी महासंघातर्फे पुण्यात २५ ते २८ मार्च या कालावधीत ३३व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा म्हाळुंगे–बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल याठिकाणी होणार असून,  या स्पर्धेत  देशभरातील तब्बल ७०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी कळविली आहे.
महासंघातर्फे महाराष्ट्र तलवारबाजी महासंघ व डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने  या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन प्रकारांत होणार आहे. यामध्ये फॉइल, इपी आणि सॅबर या तीन प्रकारांचा समावेश असणार असून, महिला आणि पुरुष खेळाडू हे वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात यामध्ये सहभाग घेतील.
टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय तलवारबाज सी ए भवानी देवी या स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक सॅबर प्रकारातील खेळात होणार सहभागी होणार असून, हे या स्पर्धेतील एक प्रमुख आकर्षण असणार आहे, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.
स्पर्धेतील वैयक्तिक सामन्यांची सुरुवात पूल फेरीने होईल, त्यानंतर ६४ खेळाडूंची  फेरी, ३२ खेळाडूंची फेरी, १६ खेळाडूंची फेरी, ८ खेळाडूंची फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे सामने होतील. तर सांघिक सामाने हे ३२ ची फेरी, ८ ची फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी या स्वरूपात होतील.
स्पर्धेच्या तयारीबाबत माहिती देताना सतेज पाटील म्हणाले, “ पुण्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंना आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या स्पर्धेसाठी क्रीडा संकुल येथे १४ पिस्ट अर्थात खेळाच्या जागा तयार केल्या आहेत. प्रत्येक खेळाडूला आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने पोषक आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे. ’’
स्पर्धेचा उदघाटन समारंभ शनिवार, २५ मार्च रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. तर सांगता समारंभ हा मंगळवार, २८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार असून, याप्रसंगी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर तलवारबाजी या खेळाच्या चाहत्यांसाठी ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेचे निकाल हे दर दोन तासांनी भारतीय तलवारबाजी महासंघाच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपडेट केले जातील. तर स्पर्धेतील काही महत्वाचे सामने हे स्पर्धेनंतर महासंघाच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित केले जातील.