पुणे, 21/03/2023: आचार्य रजनीश ओशो यांच्या शिष्यांनी उभारलेल्या लढ्याला काही प्रमाणात यश आले असून, शिष्यांच्या एकजुटीपुढे आश्रम व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेत शिष्याना संन्याशी माळा घालून आतमध्ये प्रवेश दिला. ७० व्या ओशो संबोधी दिवसानिमित्त कोरेगाव पार्क येथील ओशो आश्रमाच्या गेटवर जगभरातून दोन ते अडीच हजार ओशो शिष्य दाखल झाले होते.
ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना ओशोंची माळा गळ्यात घालून प्रवेश प्रतिबंध करण्याच्या, ओशो जयंती, ओशो महापरिनिर्वाण, गुरुपौर्णिमा, ओशो संबोधी दिवस असे कुठल्याही प्रकारचे उत्सव साजरे न करणे, तसेच आश्रमाची जागा विक्रीला काढून ओशो विचार संपवण्याच्या प्रयत्नाच्या विरोधात ओशोंच्या शिष्यांनी एकत्र येऊन निदर्शनेही केली.
यावेळी बोलताना स्वामी चैतन्य कीर्ती म्हणाले, ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या व्यवस्थापनाने ओशो शिष्यांना ओशो प्रेमींना गळ्यामध्ये माळा घालून आश्रमात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. आश्रमाची जागा विकण्यासाठी काढली आहे. या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. अतिशय शांततापूर्ण मार्गाने आम्ही आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधात आंदोलन करत आहोत. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने आश्रम व्यवस्थापनाने आज आम्हाला आतमध्ये प्रवेश करण्यास मुभा दिली आहे. आमच्या लढ्याला काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, आश्रम आणि ओशो विचार वाचवण्याचा आमचा लढा यापुढेही चालू राहणार आहे.”
अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर व्यवस्थापनाने आश्रमात प्रवेश करण्यास मुभा दिल्याने ओशो शिष्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. परंतु, आश्रमाच्या आतील समाधीची, स्विमिंग पूल व ध्यान केंद्रांची बिकट झालेली अवस्था पाहून शिष्यानी नाराजी व्यक्त केली. ओशो आश्रमाला पूर्वीसारखे वैभव प्राप्त करून देण्यासाठी लढा सुरूच ठेवणार असल्याचे अनेकांनी व्यक्त केले.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर