June 20, 2024

कथायात्रेचे ‘नवोन्मेष’ हे नवे पर्व भाषाप्रेमींच्या भेटीला येणार

पुणे, दि. २५ नोव्हेंबर, २०२३: आजच्या धकाधकीच्या जीवनातून हरवत चाललेल्या ‘गोष्टी’ला पुन्हा नव्याने झळाळी मिळावी, तिचं महत्व पुन्हा आपल्या आयुष्यात रुजावं या उद्देशाने पुण्यातील भाषा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्था व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था यांच्या सहकार्याने कथायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नवोन्मेष : सेलिब्रेटिंग स्टोरी ऑफ रिज्युव्हिनेशन’ ही यावर्षीच्या कथायात्रा २०२३ ची मध्यवर्ती संकल्पना आहे. १ ते ३ डिसेंबर २०२३ दरम्यान भाषाप्रेमींना हे ‘नवोन्मेष’ विविध ललितकलांद्वारे अनुभवता येणार आहेत.

कथायात्रेच्या दोन भागांपैकी ललितकलांचे कार्यक्रम भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या प्रांगणात आणि त्याबरोबरच आयोजित करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅंड इकॉनॉमिक्स येथे होणार आहे. तीन दिवसांच्या या ‘कथायात्रे‘मध्ये सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

‘भाषा’च्या अध्यक्षा व ‘कथायात्रे’च्या रचनाकार स्वाती राजे ‘नवोन्मेष’ विषयी अधिक माहिती देताना म्हणाल्या, “नव्या पिढीला आधीच्या पिढ्यांशी जोडणारा, आपल्या संस्कृती, इतिहासाशी नाळ राखता येण्यासाठीचा ‘कथा’ हा महत्त्वाचा धागा असतो. बालपणीच्या कितीतरी मौल्यवान आठवणी गोष्टींभोवती गुंफलेल्या असतात. आजीआजोबांच्या कुशीत, मांडीवर डोके ठेवून ऐकलेल्या बाल आणि किशोरवयातल्या कथांना आपल्या सगळ्यांच्या भावविश्वात निराळे स्थान असते. अलीकडच्या आधुनिक गतिमान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये ‘गोष्टी’चं स्थान अबाधित राहाण्यासाठी, कथनाची परंपरा तेवती राखण्यासाठी ‘भाषा’ संस्थेच्या माध्यमातून ‘कथायात्रा’ साजरी केली जात आहे. कथायात्रेचे नवे पर्व ‘नवोन्मेष’ या शीर्षकांतर्गत ‘कथे’शी निगडीत अनेकानेक बहारदार उपक्रमांचा नजराणा घेऊन भेटीला येत आहे. सर्व कथाप्रेमींना या उपक्रमांसाठी विनामूल्य प्रवेश असल्याने बाल-किशोरवयीन विद्यार्थ्यांप्रमाणेच प्रौढांना, अगदी पालक -शिक्षक आणि आजीआजोबांनाही ‘कथे’ची गंमत अनुभवता येणार आहे. अर्थात काही उपक्रम मात्र खास मुलांसाठीच आहेत, याची नोंद वेळापत्रकानुसार घेऊन या उपक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्वाती राजे यांनी केले.

——-

यंदाच्या ‘कथायात्रे’ची वैशिष्ट्ये अशी

*१ ते ३ डिसेंबर २३ दरम्यान आयोजन
*तीन दिवसांच्या भरगच्च उपक्रमांनी सजलेला सोहळा
*ललितकला प्रकारांचे सादरीकरण आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र अशा दोन उपक्रमांतून कथायात्रा सादर होणार
*ललितकलांचे सत्र भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये होणार. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे डॉ. सच्चिदानंद जोशी : प्रमुख, इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स, नवी दिल्ली व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योगपती अभय फिरोदिया यांची उपस्थिती राहाणार आहे.
* ‘बॉर्डर्स : पीपल, लाइव्हज ॲन्ड लिटरेचर’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स ॲन्ड पॉलिटिक्स येथे होणार. भारतातील विविध भागांतून आलेल्या अभ्यासक, प्राध्यापक, कवी, भाषातज्ज्ञ, कलाकार, लष्करी अधिकारी आदींकडून विविध दृष्टिकोनांतून ‘सीमा: साहित्य आणि लोकजीवन’ या विषयाचा वेध घेतला जाणार आहे.

पुणे इंटरनॅशनल सेंटर, ग्योथ इन्स्टिट्यूट – मॅक्स म्युलर भवन आणि साहित्य अकादमी यांचे सहकार्य संस्थेला लाभले आहे

प्रत्येक उपक्रम ‘कथे’शी जोडलेला

· पुण्यासह मुंबई, सिंधुदुर्ग, तसेच दिल्ली, बंगळुरू, भुवनेश्वर, कोलकता, चेन्नई आणि जर्मनी येथील मान्यवरांचे ‘कथा’ निगडित सादरीकरण

· नृत्य, नाट्य, कथा अभिवाचन, कथालेखन, आजी -आजोबांसाठी गोष्ट सांगा स्पर्धा, वैविध्यपूर्ण प्रदर्शने, व्याख्याने, फिल्म्स, पपेट शो, प्रश्नमंजूषा अशा अनेकविध उपक्रमांनी सजलेली कथायात्रा

काही मुख्य कार्यक्रम:

*ओडिसी नृत्यातून एकलव्याची कहाणी सांगणार आहेत ज्येष्ठ इटालियन नृत्यांगना पद्मश्री डॉ.इलियाना सिटारिस्टी
*पपेट शोच्या माध्यमातून नव्या दृष्टीने अरेबियन नाईट्सची कहाणी सादर करीत आहे, नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीची संस्था कटकथा,
*लावणी कलाकारांच्या जीवन कहाणीचा मागोवा घेणारे राष्ट्रीय स्तरावर गाजलेले नृत्यनाट्य ‘लावणी के रंग‘, : बी स्पॉट प्रॉडक्शन्स, मुंबई
*ज्येष्ठ हिंदी लेखक निर्मल वर्मा यांच्या कथेवर आधारित कथा सादरीकरण करत आहेत ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम
*रामायणातील कथानकांवर आधारित पिंगुळीचे बाहुली नाट्य सादर करीत आहेत सिंधुदुर्ग येथील चेतन गंगावणे
*‘व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी पाउलखुणांचा मागोवा घेत आहेत ज्येष्ठ वनअधिकारी तुषार चव्हाण
*नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला नौदलाची अभिमानगाथा सांगत आहेत रिअर ॲडमिरल आशिष कुलकर्णी व लोथल येथील नौदलाच्या संग्रहालयाचे डेप्युटी कमांडंट दोराइबाबू,
*कहाणी दशावताराची: नृत्यनाट्य : कथक व भरतनाट्यम यांचा मनोहारी संगम मुंबई व पुण्यातील तज्ज्ञ कलाकारांच्या सादरीकरणातून
* ‘मेडिसिन्स ॲक्रॉस बॉर्डस’ : पुस्तक प्रकाशन व अनुभवकथन : डॉ भरत केळकर
*अजिंठ्याच्या व वेरूळच्या डिजिटायझेशन चा कहाणीपट उलगडत आहेत रवींद्र बोरावके आणि पुणेकरांच्या भेटीला खास येत आहे
‘कहाणी लष्कराच्या बॅंडची!’ बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या दोनशे वर्षं जुन्या बॅंडची कथा व कर्णमधुर सादरीकरण

चार विविध विषयांवरील प्रदर्शने
*‘सेलिब्रेशन ऑफ लाईफ’ : द फोटोग्राफिक सोसायटी ऑफ पुणे व ‘भाषा’ने आयोजित केलेल्या स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कलाकृतींचे प्रदर्शन
*‘वन्यजीव संवर्धन‘: नेचर वॉक
*‘वारी‘: संदेश भंडारे आणि
*भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टीट्यूट मधील दुर्मिळ पुस्तकांचे खास प्रदर्शन याशिवाय, मुलांसाठी व मोठ्यांसाठी विविध कार्यशाळा, लघुपट, चित्रपट व कथामंच

भाषा संस्थेविषयी
प्रसिद्ध लेखिका, पत्रकार, बालसाहित्याच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक स्वाती राजे यांनी स्थापन केलेली ‘भाषा’ ही स्वयंसेवी संस्था प्रादेशिक भाषांचा जतन -संवर्धनासाठी गेली पंधरा वर्षे विविध प्रकल्प- उपक्रमांद्वारे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये लेखक, पत्रकार, दृकश्राव्य माध्यमतज्ज्ञ, अनुभवी व्यावसायिक, उद्योगपती, कलाकार, प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. आपल्या मातृभाषेविषयीची जाणीवजागृती, रुची आणि प्रेम निर्माण करण्यासाठी पारंपरिक व आधुनिक सर्व माध्यमांचा कल्पक वापर करण्याकडे ‘भाषा’ संस्था लक्ष पुरवते. आपल्या भाषिक वारशाचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी नव्या पिढीला ग्रंथांशी जोडणे, हा प्रमुख उद्देश ‘भाषा’ संस्था मध्यवर्ती ठेवून कार्यरत आहे. भाषा संस्थेच्या सर्व उपक्रमांना आजवर प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. स्थानिक पातळीवर तसेच राज्य – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘भाषा’ चे उपक्रम सुरू आहेत आणि या उपक्रमांचे औचित्य साऱ्यांच्या आदराचा व कौतुकाचा भाग बनले आहे.