May 11, 2024

शहरातील हवेच्या प्रदुषणासंदर्भात क्रेडाई पुणे मेट्रोची भूमिका

पुणे, 25 नोव्हेंबर 2023: अनेकविध कारणांमुळे शहरातील नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम करणारा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खालावल्याबद्दल क्रेडाई पुणे मेट्रो देखील गंभीरपणे चिंतित असून वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्राधिकरणांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने आम्ही स्वागत करतो. याबरोबरच प्राधिकरणांकडून होत असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अमंलबजावणीत देखील आम्ही सहकार्य करू.

माननीय सर्वोच्च न्यायालय / उच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग यांनी जारी केलेल्या सूचना / मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे आम्ही आमच्या सदस्यांना बांधकाम प्रकल्पाच्या जागेवर आवश्यक व्यवस्था आणि यंत्रणा बसवण्याची, बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी हिरवी जाळी बसविण्याची विनंती केली आहे. इतकेच नव्हे तर प्रकल्पस्थळी होणाऱ्या वाहतुकीदरम्यान बांधकामाचा मलबा हवेत जाऊ नये यासाठी प्रत्येक पुरवठादार व ट्रकची व्यवस्था पाहणाऱ्यांना बांधकाम प्रकल्पावर येणारे ट्रक / पुरवठादारांची वाहने ही पूर्णपणे झाकलेला आहेत याची खात्री करण्यास सांगितले जात आहे.

याशिवाय वाहनाचे पीयुसी वैध असल्याची खात्री करण्यासोबतच मुख्य स्टॉकयार्डमध्ये असलेले सैल बांधकाम साहित्य ताडपत्रींनी झाकण्याविषयीच्या सूचना बांधकाम प्रकल्पावर देण्यात आल्या आहेत.

आमच्या सदस्यांनी या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सुरू केली असली तरी व्यावहारिक मुद्द्यांचा विचार करून पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांना आम्ही देखील काही महत्त्वाच्या सूचना करीत आहोत, त्या पुढीलप्रमाणे –

– मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व बांधकाम प्रकल्पाच्या जागेवर २५ फूट जीआय / मेटल शीट असणे आवश्यक आहे, तथापि व्यावहारिक अडचणी लक्षात घेता, आम्ही किमान १४ फूट उंचीची जीआय /मेटल शीट आणि त्याहून वर चहुबाजूंनी ६ फूट हिरवे कापड परिघाभोवती असावे असे सुचवले आहे. १४ फुटांपेक्षा जास्त जीआय / मेटल शीटच्या उंचीमध्ये जर वाढ केली तर शेजारील इमारतींच्या प्रकाश आणि वेंटिलेशनमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. शिवाय हवेच्या / वाऱ्याच्या दाबामुळे सुरक्षेचे धोके देखील निर्माण होऊ शकतात इतकेच नाही तर झाडे तोडण्याची देखील आवश्यकता भासू शकते.

– हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणारी यंत्रणा ही पुरवठादाराकडे उपलब्ध नसल्याने त्यांनी पुरवठादाराने सांगितलेल्या वेळेनुसार प्रकल्प प्रमोटर ९० दिवसांच्या कालावधीत बांधकाम प्रकल्पावर ही यंत्रणा खरेदी करेल.

– प्रकल्प प्रमोटर ६० दिवसांच्या कालावधीत प्रकल्पाच्या बांधकाम जागेवर ज्या ठिकाणी सामग्रीचे लोडिंग / अनलोडिंग होते त्या ठिकाणी स्प्रिंकलर सिस्टीम बसवेल.

– बांधकाम प्रकल्पावरील सर्व कर्मचार्‍यांना न चुकता आपल्या वैयक्तिक संरक्षणासाठी असलेली मास्क, हातमोजे, गॉगल्स, हेल्मेट आदी साधने अनिवार्यपणे परिधान करावी लागणार आहेत.

– बांधकाम प्रकल्पावर प्रशस्त ड्राईव्ह वे असल्याची खात्री प्रकल्प प्रमोटर्सने आधीच करून घ्यावी. जर पक्का रस्ता नसेल तर प्रकल्प प्रमोटरला त्या ठिकाणी होणारी धूळ कमी करण्यासाठी नियमितपणे जमिनीवर पाणी शिंपडणे आवश्यक आहे.

आम्हाला कल्पना आहे की अधिकाऱ्यांनी शहरातील वायू प्रदूषण रोखण्‍यासाठी जारी करण्‍याच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती अंमलबजावणी करण्‍याच्या दृष्टीने आमच्‍या काही सदस्‍यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र क्रेडाई पुणे मेट्रो हे स्पष्ट करू इच्छिते की, देण्यात आलेल्या या नोटिस केवळ सावधगिरीच्या स्वरूपाच्या आहेत, यामुळे कोणत्याही प्रकल्पावरील काम थांबविण्यात आलेले नाही. प्राधिकरणांनी दिलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात कुचराई झाल्यास त्याला क्रेडाई पुणे मेट्रोचे समर्थन नसेल व याची कृपया नोंद घ्यावी.