October 14, 2025

‘दीपक’ या कार्यक्रमाचे येत्या २३ जून रोजी आयोजन

पुणे, दि. १७ जून, २०२४ : पुण्यातील सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर यांच्या कथक नाद या संस्थेच्या वतीने येत्या रविवार दि २३ जून रोजी मयूर कॉलनी येथील एमईएस बालशिक्षण सभागृहात सायं ५ वाजल्यापासून ‘दीपक – अ सोर्स ऑफ लाईट’ या नृत्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल.

याविषयी अधिक माहिती देताना शीतल कोलवालकर म्हणाल्या, “माझ्या आजवरच्या नृत्याच्या प्रवासात माझे आई- वडील आणि गुरूंचे योगदान फार मोठे आहे. या सर्वांनी कायमच मला प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले. माझ्या वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेली दोन वर्षे आम्ही त्यांच्या नावाने ‘दीपक’ या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहोत. या कार्यक्रमाद्वारे नवोदित व आश्वासक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबत त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा उद्देश आहे.”

यावर्षी दीपक या कार्यक्रमात तीन प्रतिथयश नृत्यांगना आपली कला उपस्थितांसमोर सादर करणार असून कथक नृत्यातील तीन प्रवाह यावेळी रसिकांना अनुभविता येतील. यामध्ये श्रुती कुलकर्णी या कथक गुरु आभा आवटी यांच्या शिष्या एकल नृत्य सादर करतील यानंतर कथक गुरु शमा भाटे यांच्या शिष्या असलेल्या शीतल कोलवालकर यांचे कथक सादरीकरण होईल. कार्यक्रमाचा शेवट कथक गुरु मनीषा साठे यांच्या एकल सादरीकरणाने होईल.