October 16, 2025

विनयभंग करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाला जेजुरीतून अटक, पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना

पुणे, १८/०३/२०२३: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाला चतु:शृंगी पोलिसांनी जेजुरी परिसरात अटक केली.

सचिन जगताप (वय ३९, रा. कोंढवे धावडे, उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत एका युवतीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार युवती कोथरूड परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती परराज्यातील आहे. तिचे विद्यापीठात काम होते. कोथरुड परिसरातून ती गुरुवारी (१६ मार्च) रिक्षाने विद्यापीठाच्या आवारात आली. सायंकाळी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. विद्यापीठाच्या आवारात रिक्षात थांबलेल्या युवतीशी रिक्षाचालकाने अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. तिने रिक्षाचालकाला विरोध केला आणि ती रिक्षातून बाहेर पडली. रिक्षाचालकाने युवतीला धमकावून तिचा मोबाइल क्रमांक घेतला. घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली.

त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांकडून रिक्षाचालकाचा शोध सुरू करण्यात आला. रिक्षाचालक सचिन जगताप जेजुरी परिसरात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली.

You may have missed