पुणे, १७ मार्च २०२५ : उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना आता ऊन लागून नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढत आहे या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी उन्हामध्ये फिरू नये असे आवाहन केले आहे.
उष्माघाता पासून स्वत:चा व स्वतःच्या कुटुंबियांचा बचाव करा
या जाहीर निवेदनाद्वारे सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, सध्या शहराच्या तापमानात वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच उपचार न केल्यास उष्माघातामुळे व त्यामुळे होणाऱ्या डिहायड्रेशन (जलशुष्कता) मूळे मृत्यूही ओढवू शकतो.
उष्माघात होण्याची कारणे :-
उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.
लक्षणे :-
मळमळ,उलटी,हाता पायात गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरूत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता, बेशुद्धवस्था इत्यादी.
अतिजोखमीच्या व्यक्ती:-
बालके, लहान मुले, खेळाडू सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना
हृदयरोग,फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार इ.
प्रतिबंधक उपाय :-
१) वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात असताना करावीत.
२) उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे ) वापरू नयेत. सौल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत. तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जातांना पाणी सोबत ठेवावे.
३) पाणी भरपूर प्यावे डिहायड्रेशन होऊ देऊ नये, गरज पडल्यास लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे.
४) उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादी चा वापर करावा.
५) घरामध्ये कामाच्या ठिकाणी पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्या.
६) पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.
७) पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्यातासाच्या फरकाने पाणी प्यावे.
८) दुपारी १२ ते ३ वाजे दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
९) सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
१०) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टी. व्ही., किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर
करण्यात यावा.
११) उन्हात काम करीत असल्यास टोपी. छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.
१२) गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
१३) गरोदर स्त्रिया व आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.
१४) सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे.
१५) दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.
१६) उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
१७) उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या मनपाच्या आरोग्य केंद्र / रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा.
उपचार :-
१) रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
२) रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू करावेत, रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड करून पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे.
३) रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एयर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत.
४) रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा, कॉफी देऊ नये.
५) रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात.
६) थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत रहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत.
७) रुग्णाने नजीकाच्या मनपा आरोग्य केंद्रात अथवा खाजगी रुग्णालयाशी संपर्क साधावा. रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास १०८ अॅम्बुलन्ससाठी कॉल करावा. पुणे म.न.पा कमला नेहरू रुग्णालय, येथे उष्माघात कक्ष करण्यात आला आहे.
More Stories
माजी आमदार रवींद्र धंगेकरांवर समीर पाटीलने दाखल केला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
“बोट घातलं तर हात घालू, ॲक्शनला रिऍकशन मिळणार!” – अमित ठाकरे यांचा अभाविपला इशारा
Pune: अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्यास उमेदवारी अर्ज बाद; उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी