पुणे, १७ मार्च २०२५: ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने सोमवारी महाबँकेचे मुख्यालय ‘लोकमंगल’ समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिपाई, लिपिक यांसह वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची भरती, बँक व्यवस्थापनाच्या मनमानीस थांबविणे, कर्मचार्यांशी केलेल्या करारांचे पालन, ग्राहकांस चांगल्या व सुरक्षित सेवा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनाप्रसंगी फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर, संघटन सचिव शैलेश टिळेकर आदी उपस्थित होते. या आंदोलनात ५१ झोनल कार्यालयांमधील ५०० हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्रचे देशभरातील या मागण्यांसाठी २० मार्च रोजी एक दिवसाचे देशव्यापी संप पुकारणार आहेत. हा संप प्रामुख्याने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आहे. बँकेने २०२१ साली सफाई कर्मचारी हे पदच रद्द केले. हे काम आऊटसोर्स केले व त्यांना किमान वेतन देखील दिले जात नसून त्यांना रजा, वैद्यकीय सेवा अशा कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या पदावर अनेक वर्षांपासून तात्पुरत्या पदावर काम करणारे हजारो कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले.
बँकेत ७०० पेक्षा अधिक शाखेतून नियमित शिपाई नेमण्यात आलेले नाहीत. बँकेत ३१८ शाखा आहेत जेथे एकही लिपिक नेमण्यात आले नसून १२९० शाखा अशा आहेत जेथे केवळ एक लिपिक आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेळ संपली, तरी जास्त वेळ बसून काम पूर्ण करून जावे लागते. सुट्टीच्या दिवशी कामावर यावे लागते. आजारपण असो की सांसारिक जबाबदाऱ्या यासाठी आवश्यकतेनुसार रजा मिळत नाही. काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल बिघडला आहे. कर्मचारी सतत ताण-तणावात काम करत आहेत. त्यामुळे सतत आजारी पडत आहेत. याचा ग्राहकसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. एकीकडे ग्राहकांची संख्या वाढते आहे, त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली आहे. यासाठीच कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की, बँकेने त्वरित सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांची पुरेशी भरती करावी, जेणेकरून समाधानकारक ग्राहकसेवा देता येऊ शकेल.
याशिवाय कमी कर्मचाऱ्यात अधिक काम, यात बँकेचे नियम काटेकोरपणे पाळल्या जात नाहीत. त्यामुळे फसवणूकीची शक्यता निर्माण होत असू न बँक तसेच ग्राहकांचे यामुळे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? याबाबत बँक संवेदनशील नसल्याने येत्या २० मार्च रोजी महाबँकेत संप पुकारण्यात येणार आहे.
याशिवाय बँक कर्मचारी संघटनांशी केलेले कायदेशीर करार, उच्चन्यायालयाचे आदेश सगळेच धाब्यावर बसवून बँक व्यवस्थापन मनमानी करत आहे.परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. महाबँकेच्या ग्राहकांनी आमची भूमिका समजून घ्यावी आणि आमच्या संपाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांनी यावेळी केले.
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी