पुणे, १ जून २०२४: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल)२०२४ स्पर्धा आज (रविवार, २जून २०२४ पासून) एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार असून सलामीच्या लढतीत गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघासमोर उपविजेत्या पुनीत बालन ग्रुप (पीबीजी) कोल्हापूर टस्कर्स संघाचे आव्हान असणार आहे.
एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले की, गतवर्षीच्या एमपीएल स्पर्धेत आमच्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळाले. मला विश्वास आहे की महाराष्ट्र प्रिमियर लीगमधील गुणवान खेळाडू भविष्यात आयपीएल व भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेसाठी सर्व क्रिकेटप्रेमींना मोफत प्रवेश असणार आहे. त्यामुळे मी सर्व क्रिकेट प्रेमींना आव्हान करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मैदानात येऊन आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवावा.
एमसीएचे मानद सचिव ऍड. कमलेश पिसाळ यांनी सांगितले, “एमपीएल टी-२० प्रकारची स्पर्धा बीसीसीआयच्या मान्यतेने होत असून महाराष्ट्र क्रिकेट संघटेनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर बीसीसीआयच्या खास परवानगीने ही स्पर्धा अल्पावधीतच आयोजित करताना एमसीएने प्रशंसनीय कामगिरी केली आहे. स्पर्धेचा उदघाटन समारंभ सायंकाळी ६ वाजता सुरू होणार असून कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉय यांच्या नृत्याने होणार आहे. याबरोबरच प्रसिद्ध गायक संजू राठोड यांच्या लोकप्रिय ठरलेल्या आणि सध्या गाजत असलेले गुलाबी साडी या गाण्याचे या दरम्यान सादरीकरण करणार आहेत.”
रत्नागिरी जेट्स विरूद्ध पुनीत बालन ग्रुप (पीबीजी) कोल्हापूर टस्कर्स
रत्नागिरी व कोल्हापूर या संघांची एमपीएलमध्ये गतवर्षी अंतिम फेरीसह तीन वेळा गाठ पडली होती. त्यात दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला होता. महाराष्ट्राचा अव्वल फलंदाज अंकित बावणेने वेगवान शतक झळकवताना कोल्हापूर संघाला विजय मिळवून दिला होता. तर क्वालिफायर १ लढतीत कोल्हापूरच्या केदार जाधवने अर्धशतक झळकावूनही रत्नागिरी जेट्स संघाने बाजी मारली होती. अंतिम सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यामुळे सरस धावगतीच्या निकषावर त्यांना विजेते घोषीत करण्यात आले.
रत्नागिरी जेट्स संघाकडे नामवंत खेळाडू नसले तरी सांघिक कामगिरी हे त्यांचे बलस्थान आहे. महाराष्ट्राचा डावखुरा फिरकी गोलंदाज सत्याजित बच्छाव याला ६००००रुपये च्या मूळ किंमतीला खरेदी करताना रत्नागिरी संघाने महत्वाचा खेळाडू मिळवला होता. गतवर्षीचा आमचा मूळ संघ कायम ठेवताना आम्ही सत्यजीत बच्छाव समावेश करून फायदा मिळवला आहे, असे सांगून रत्नागिरी संघाचा कर्णधार अझिम काझी म्हणाला की, यंदाच्या मौसमासाठी आमचे पूर्वतयारी शिबिर उत्तमरित्या पार पडले असून सर्व खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. गतविजेतेपद राखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
दुसऱ्या बाजूला पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स संघाने गतवर्षीचा सर्वात महागडा खेळाडू नौशाद शेखला मुक्त केले. अर्थात, अष्टपैलू श्रीकांत मुंढे, यष्टिरक्षक फलंदाज अनिकेत पोरवाल आणि डावखुरा फिरकीपटू यश खळदकर यांच्या समावेशाने त्यांचा संघ बलवान बनला आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोल्हापूर संघात अंकित बावणेसह 19 वर्षाखालील भारतीय संघातील सचिन धस, सिध्दार्थ म्हात्रे आणि तरणजित सिंग धिल्लोन यांसारख्या दर्जेदार खेळाडूंचाही समावेश आहे. गतविजेते आणि उपविजेत्या मधील सलामीच्या लढतीतून अत्यंत रोमांचकारी अशा यंदाच्या एमपीएल मौसमाला तितकाच रोमांचकारी प्रारंभ होईल, अशी क्रिकेट शौकिनांची अपेक्षा आहे.
तसेच, भारतातील क्रिकेट चाहत्यांना महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४चे सर्व सामने स्पोर्टस १८ वर पाहता येणार आहे. या स्पर्धेच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्टस १८वर होणार आहे. याशिवाय क्रिकेप्रेमींना जिओ सिनेमा व वेबसाईटवर देखील सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.
महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल)२०२४ स्पर्धेचे साखळी सामने २ ते १८ जुन या कालावधीत रंगणार आहे.२,१०,१५ व १८ जून २०२४ हे दिवस वगळता सर्व दिवस दोन लढती असणार आहेत.
यातील पहिला सामना दुपारी २वाजता सुरू होणार असून दुसरा सामना सायंकाळी ७ वाजता होणार आहे. प्लेऑफ च्या क्वालिफायर पहिली लढत १९ जून रोजी, तर, क्वालिफायर दुसरी व एलीमिनेटर लढत अनुक्रमे २०जुन व २१ जून २०२४ रोजी होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २२ जून २०२४रोजी होणार आहे. प्ले ऑफच्या सर्व लढती सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
तारीख सामना वेळ
२ जून रत्नागिरी जेट्स वि. कोल्हापूर टस्कर्स सायं. ७ वा
३ जून ईगल नाशिक टायटन्स वि. पुणेरी बाप्पा दु. २ वा
३ जून रायगड रॉयल्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज ७:०० वाजता
४ जून रत्नागिरी जेट्स वि. रायगड रॉयल्स दु. २ वा
४ जून कोल्हापूर टस्कर्स वि. पुणेरी बाप्पा सायं. ७ वा
५ जून रत्नागिरी जेट्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज दु. २ वा
५ जून कोल्हापूर टस्कर्स वि. ईगल नाशिक टायटन्स सायं. ७ वा
६ जून पुणेरी बाप्पा वि. रायगड रॉयल्स दु. २ वा
६ जून ईगल नाशिक टायटन्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज सायं. ७ वा
७ जून कोल्हापूर टस्कर्स वि. रायगड रॉयल्स दु. २ वा
७ जून रत्नागिरी जेट्स वि. पुणेरी बाप्पा सायं. ७ वा
८ जून कोल्हापूर टस्कर्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज दु. २ वा
८ जून रत्नागिरी जेट्स वि. ईगल नाशिक टायटन्स सायं. ७ वा
९ जून पुणेरी बाप्पा वि. छत्रपती संभाजी किंग्ज दु. २ वा
९ जून ईगल नाशिक टायटन्स वि. रायगड रॉयल्स सायं. ७ वा
१० जून रत्नागिरी जेट्स वि. कोल्हापूर टस्कर्स सायं. ७ वा
११ जून रायगड रॉयल्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज दु. २ वा
११ जून ईगल नाशिक टायटन्स वि. पुणेरी बाप्पा सायं. ७ वा
१२ जून कोल्हापूर टस्कर्स वि. पुणेरी बाप्पा दु. २ वा
१२ जून रत्नागिरी जेट्स वि. रायगड रॉयल्स सायं. ७ वा
१३ जून कोल्हापूर टस्कर्स वि. ईगल नाशिक टायटन्स दु. २ वा
१३ जून रत्नागिरी जेट्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज सायं. ७ वा
१४ जून ईगल नाशिक टायटन्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज दु. २ वा
१४ जून कोल्हापूर टस्कर्स वि. रायगड रॉयल्स सायं. ७ वा
१५ जून पुणेरी बाप्पा वि. रायगड रॉयल्स सायं. ७ वा
१६ जून रत्नागिरी जेट्स वि. ईगल नाशिक टायटन्स दु. २ वा
१६ जून कोल्हापूर टस्कर्स वि. छत्रपती संभाजी किंग्ज सायं. ७ वा
१७ जून ईगल नाशिक टायटन्स वि. रायगड रॉयल्स दु. २ वा
१७ जून पुणेरी बाप्पा वि. छत्रपती संभाजी किंग्ज सायं. ७ वा
१८ जून रत्नागिरी जेट्स वि. पुणेरी बाप्पा सायं. ७ वा
१९ जून क्वालिफायर १ सायं. ७ वा
२० जून एलिमिनेटर सायं. ७ वा
२१ जून क्वालीफायर २ सायं. ७ वा
२२ जून फायनल सायं. ७ वा.
More Stories
पहिल्या पुना क्लब डेक्कन जिमखाना मैत्रीपूर्ण बॅडमिंटन लीग स्पर्धेत कटक्कर ईगल्स संघाला विजेतेपद
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला