September 14, 2024

उबेरसह चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा ‘ॲग्रीगेटर लायसन्स’ नाकारले

पुणे 21 एप्रिल 2023: ‘मोटार वाहन समुच्चयक मार्गदर्शक सूचना- 2020’ मधील आवश्यक तरतुदींची पूर्तता होत नसल्याच्या अनुषंगाने मे. ॲनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे, मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. पुणे आणि मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा.लि. पुणे या चार कंपन्यांना तीनचाकी ऑटोरिक्षा संवर्गात ‘समुच्चयक अनुज्ञप्ती’ (ॲग्रीगेटर लायसन्स) नाकारण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

गुरुवारी (20 एप्रिल) जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चार कंपन्यांचे ॲग्रीगेटर लायसन्स साठीचे अर्ज विचारार्थ ठेवण्यात आले होते. यामध्ये मे. ॲनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे व मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि. यांनी चार चाकी हलकी मोटार वाहने व तीन चाकी ऑटो रिक्षा या दोन्ही संवर्गासाठी तर मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉजीज प्रा.लि. पुणे व मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा.लि. पुणे यांनी तीन चाकी ऑटो रिक्षा संवर्गासाठी ॲग्रीगेटर लायसन्स मिळण्यासाठी अर्ज केले होते.

मोटार व्हेईकल ॲग्रीगेटर गाईडलाईन्स, २०२० मधील तरतुदीन्वये चारही अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमारे सादर करण्यात आले होते. चारही कंपन्यांचे ऑटोरिक्षा संवर्गात ‘समुच्चयक अनुज्ञप्ती’ नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मे. ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा.लि. व मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा.लि. यांना चारचाकी हलकी मोटार वाहने संवर्गाकरीता ॲग्रीगेटर लायसन्स जारी करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे, अशीही माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिली आहे.