पुणे, ११ जून २०२५ः पुणे-नगर रस्त्यावर दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, असुरक्षित पादचारी मार्ग, अपुरी रस्ता रचना आणि सार्वजनिक सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी महानगरपालिका प्रशासन, वाहतूक नियंत्रण विभाग आणि पुणे शहर वाहतूक शाखेला निवेदनाद्वारे विविध उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
येरवडा, शास्त्रीनगर, कल्याणीनगर, रामवाडी, विमाननगर, टाटा गार्डन, खराडी बायपास, जनक बाबा दर्गा, युवान आयटी पार्क, खराडी जकात नाका या परिसरांमध्ये सिग्नल फ्री योजना अंमलात आणली गेली आहे. त्यामुळे वाहतूक प्रवाह सुरळीत झाला असला, तरी पादचारी आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अद्यापही कायम असल्याचे पठारे यांनी निदर्शनास आणून दिले.
पठारे यांनी सूचवलेल्या महत्त्वाच्या उपाययोजना-
बीआरटी मार्ग काढल्यानंतर विस्कळीत झालेला डिव्हायडर रस्त्याच्या मध्यभागी नेणे
झेब्रा क्रॉसिंग, फूटपाथ आणि पादचारी सिग्नल्सची उभारणी
डिव्हायडर सुरू होणाऱ्या ठिकाणी प्रतिबिंबित फलक बसविणे
दिशादर्शक व मार्गदर्शक फलकांची उभारणी
विमाननगर आणि चंदननगर येथील भुयारी मार्गांची तातडीने दुरुस्ती, प्रकाशयोजना आणि साफसफाई
वाहतूक नियंत्रणासाठी स्मार्ट सिग्नल यंत्रणा
भुयारी मार्गांबाबत स्वतंत्र निवेदन-
विमाननगर आणि चंदननगर येथील भुयारी मार्ग अत्यंत निकृष्ट स्थितीत असून, यामध्ये प्रकाशयोजना अपुरी आहे, साफसफाईचा अभाव आहे आणि त्यामुळे महिलांसह विद्यार्थी, वृद्ध नागरिक यांना ते वापरणे असुरक्षित वाटते. या मार्गांची तातडीने दुरुस्ती व्हावी आणि ते नागरिकांसाठी सुरक्षित बनवावेत, अशी मागणी पठारे यांनी दुसऱ्या निवेदनात केली आहे.
“वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. फक्त वाहतूक कोंडी हटवणे पुरेसे नाही, तर ती सुरक्षितही असावी लागते. मी दिलेल्या सूचनांचा योग्य विचार प्रशासन दरबारी होईल, अशी मला खात्री आहे. वाहतूक आणि दळणवळण हे नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, आणि त्या दृष्टीने कोणतीही तडजोड होऊ नये,” असे आमदार पठारे यांनी स्पष्ट केले.

More Stories
मतदान करा, हेच खरे आवाहन ; अभिनेते प्रवीण तरडे यांचे मतदात्यांना आवाहन
अभिनेता सुबोध भावे यांनी पुणेकरांसोबत मतदानाचा हक्क बजावला
शाई पुसून मतदानाचा गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणार नाही