June 24, 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ट्राय – सर्व्हिस बँड डिस्प्ले कार्यक्रम संपन्न

पुणे, 15 सप्टेंबर 2023: भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापाठोपाठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे स्थित भारतीय लष्कराची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी. ए . ) च्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन्ही संस्थांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी ट्राय – सर्व्हिस बँड डिस्प्ले हा कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एन.डी. ए . आणि कर्वे समाज संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक करतांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, “भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाच्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ट्राय – सर्व्हिस बँड डिस्प्ले कार्यक्रमातून युवकांमध्ये लष्करी सेवेविषयी आकर्षण निर्माण होईल आणि त्यांच्या मनात देशसेवेची ज्योत निर्माण होईल” कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दोन्ही संस्थांच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने आयोजित राष्ट्रगौरवाच्या सादरीकरणाच्या या कार्यक्रमात उपस्थितांचे अमृतमहोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देत स्वागत केले.

या समारंभास प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेशजी पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, सर्व संविधानिक अधिकारी, प्रशासकीय व शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख, महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी – कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी उपस्थितांना यावेळी मेरी माटी मेरा देश या अभियानाअंतर्गत पंचप्रण ची शपथ घेण्याची विनंती केली. तसेच एन.डी. ए . येथील मातीचा कलश विजय कालाजी यांनी, कर्वे समाज संस्था, पुणे येथील मातीचा कलश मधुकर पाठक यांनी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील मातीचा कलश डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना सुपूर्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश ठाकूर यांनी केले तर कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी एन.डी.ए., कर्वे समाज संस्था, पुणे आणि उपस्थितांचे विद्यापीठाच्या वतीने आभार मानले.