December 2, 2023

महावितरणच्या पुण्यातील तीन उपकेंद्रांना ‘आयएसओ’चे मानांकन

पुणे, १५ सप्टेंबर २०२३: महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत शिवाजीनगर विभागातील तीन उपकेंद्रांनी एकाच वेळी ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकन मिळविले आहे. पुणे परिमंडलांतील तीन उपकेंद्रांना राज्यात प्रथमच एकाचवेळी ‘आयएसओ’च्या मानांकनाचा बहुमान मिळवला आहे.

रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात शुक्रवारी (दि. १५) आयोजित कार्यक्रमात मुख्य अभियंता राजेंद्र पवार व ‘आयएसओ’चे अंकेक्षक व परीक्षक श्री. नंदकिशोर देशमुख यांच्या उपस्थितीत संबंधित उपकेंद्रांना ‘आयएसओ’ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणचे उपकेंद्र व स्विचिंग स्टेशन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. या उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणासोबतच त्याची योग्य निगा, दर्जा व व गुणवत्ता अबाधित ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले होते. त्यानुसार शिवाजीनगर विभागातील सुस रोड २२/२२/११ केव्ही उपकेंद्र (गणेशखिंड उपविभाग) तसेच मोहननगर व अमर पॅराडिगम २२/२२ केव्ही स्विचिंग स्टेशन (औंध उपविभाग) या तीन उपकेंद्रांनी एकाचवेळी आयएसओ ९००१:२०१५ च्या मानांकनासाठी पुर्वतयारी सुरु केली. यामध्ये उपकेंद्रांची गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सर्व प्रकारची सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, दस्ताऐवजीकरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदी कामे करण्यात आली. त्यानंतर आयएसओ ९००१:२०१५ च्या पथकाने या तिनही उपकेंद्रांना नुकतीच भेट दिली व तब्बल २७ अटी व शर्तींच्या मानकांप्रमाणे तपासणी केली. यात तिनही उपकेंद्र ‘आयएसओ’च्या मानांकनासाठी पात्र ठरले.

‘आयएसओ’चे मानांकन मिळविण्यासाठी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात शिवाजीनगर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. संजीव राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. विश्वास भोसले, श्री. सचिन पाटील, पंडित दांडगे यांच्यासह सहायक अभियंता रमेश सुळ, गणेश श्रीखंडे, तंत्रज्ञ श्री. बाळासाहेब खिलारे, कु. शुभांगी शिरोळे, श्री. सचिन कांबळे, महेश सुतार, हनुमंत शिंगटे यांनी कामगिरी केली.

मनोगत – राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– ‘सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या उपकेंद्राचा दर्जा व कार्यक्षमता अतिशय महत्वाची आहे. त्यादृष्टीने सातत्याने पर्यवेक्षण व उपाययोजना केल्या जातात. यामध्ये एकाचवेळी तीन उपकेंद्रांना आयएसओ ९००१:२०१५ चे मानांकन मिळाले ही गौरवाची बाब आहे. वीजग्राहकांना सुरळीत व दर्जेदार सेवा देण्यासाठी केलेल्या तयारीची ही पावती आहे.’