October 15, 2025

योनेक्स सनराईज व्हीव्ही नातू मेमोरियल अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेस 8जुलै पासून प्रारंभ

पुणे, 6 जुलै 2024: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने योनेक्स सनराईज व्हीव्ही नातू मेमोरियल अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा पीडीएमबीए स्पोर्टस कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर येथे 8ते 14जुलै 2024 या कालावधीत रंगणार आहे.

स्पर्धेचे संयोजन सचिव राजीव बाग यांनी सांगितले की,
व्हीव्ही नातू यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून स्पर्धेचे हे 32वे वर्ष आहे. भारतीय बॅडमिंटनमधील एक महत्वपूर्ण स्पर्धा असून, यामध्ये देशभरातील वरिष्ठ खेळाडू आपले कौशल्य आणि प्रतिभा दाखवण्यासाठी सहभागी होतात.

पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना(एमबीए) व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) यांच्या मान्यतेखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, ही स्पर्धा पुरुष एकेरी व दुहेरी गट, महिला एकेरी व दुहेरी गट, मिश्र गटात पार पडणार आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून वरिष्ठ बॅडमिंटन खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची व महत्वपूर्ण गुण प्राप्त करण्याची संधी मिळते. याशिवाय व्हीव्ही नातू यांनी बॅडमिंटनसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे बाग यांनी नमूद केले.

स्पर्धेत एकूण 5लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेप्रसंगी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे सचिव श्रीकांत वाड, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सह सचिव व आशियाई बॅडमिंटनच्या तांत्रिक अधिकारी समितीचे चेअरमन ओमर राशिद आणि बीएआयच्या स्पर्धा समितीचे चेअरमन सेखर बिस्वास उपस्थित राहणार आहेत.