May 16, 2024

‘प्रो कबड्डी लीग’च्या दहाव्या सिझनचे विजेतेपद जिंकल्यावर पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन,

पुणे/महाराष्ट्र, 09 मार्च 2024 : ‘प्रो कबड्डी लीग’च्या दहाव्या सिझनचे विजेतेपद जिंकल्यावर पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर त्यांनी दगडूशेठ गणपती मंदिरात जावून गणपती बाप्पाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. तेथे त्यांनी बाप्पाची आरतीही केली. शनिवारी सकाळी पुणेरी पलटणची संपूर्ण टीम, प्रशिक्षक, त्यांचे अधिकारी यांची भव्य विजयी रॅली डेक्कन जिमखाना ते गणपती मंदिरदरम्यान काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत ४० बाईकधारी कबड्डीप्रेमी हातात झेंडे आणि ढोल वाजवीत कूच करत होते.

खेळाडूंबरोबर यावेळी त्यांचे प्रशिक्षक, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ही रॅली सकाळी ११ वाजता डेक्कन जिमखाना येथून निघाली आणि एका तासात मंदिरात पोहोचली. या रॅलीदरम्यान पुणे येथील रस्त्यांवर या विजयी संघाचे पुणेकरांनी फार मोठ्या प्रमाणात स्वागत केले.

पुणेरी पलटणने हरयाणा स्टीलर्सना अंतिम सामन्यात मात दिली आणि विजेतेपद खिशात टाकले. ‘प्रो कबड्डी लीग’च्या अंतिम सामन्यात हरयाणाच्या तेवढ्याच सशक्त अशा संघाला ‘पुणेरी पलटण’ने मात दिली. २८-२५ अशी ही लढत झाली. प्रो कबड्डीच्या दहाव्या सिझनचे विजेतेपद जिंकून पुणेरी पलटणने पीकेएलच्या नवव्या मोसमात जयपूर पिंककडून जो पराभव झाला होता त्याचा पुरेपूर वचपा काढला. हा सामना जिंकताना ‘पुणेरी पलटण’ने आपले संपूर्ण टूर्नामेंटमधील वर्चस्व राखून ठेवले. २२ सामन्यांमध्ये या संघाने तब्बल ९६ गुण मिळविले आणि त्यांपैकी १७ सामने जिंकले, ३ बरोबरीत सोडवले तर दोन सामन्यांमध्ये त्यांना हार पत्करावी लागली.

शनिवारी झालेल्या रॅली आणि आरतीनंतर डेक्कन जिमखाना येथे या खेळाडूंची एक पत्रकार परिषद झाली. पत्रकारांशी बोलताना पुणेरी पलटणचे प्रशिक्षक बी सी रमेश यांनी म्हटले, “यावेळी आमचा संघ प्रत्येक बाबतीत भक्कम होता आणि ते आमचे वैशिष्ट्य ठरले. आमच्या संघातील जवळजवळ प्रत्येक खेळाडू हा अष्टपैलू होता आणि त्या प्रत्येकाने आमच्या टीमच्या विजयात महत्वाची कामगिरी पार पाडली. बाद झालेल्या खेळाडूंना पुन्हा मॅटवर आणण्यात संघाने यश मिळविले. जे महत्त्वाचे क्षण होते, त्यात आमच्या संघाने बाजी मारली.”

संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कैलाश कांडपाल म्हणाले, “पीकेएल’च्या पहिल्या सिझनपासूनचा विचार करता पुणेरी पलटणचा प्रवास खूप मोठा राहिला आहे. या प्रक्रियेत खूप काही शिकायला मिळाले आणि ‘युवा पलटण’सारख्या आमच्या उपक्रमातून आम्ही अगदी तळागाळापर्यंत पोहोचलो. त्या उपक्रमातून युवा खेळाडू उभे केले आणि त्यांना मोठ्या सामन्यांसाठी तयार केले. ज्या युवा खेळाडूंना आम्ही शिकविले आणि तयार केले त्यांनी दहाव्या सिझनमध्ये सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी केली आणि शेवटी विजयश्री खेचून आणली. या संपूर्ण प्रक्रियेचे आम्हाला खूप समाधान आहे.”

‘पुणेरी पलटण’चा कप्तान की जो ‘पीकेएल’मधील एक सर्वात युवा असा कप्तान आहे, त्या अस्लम इनामदारने म्हटले, “आमचे धोरण खूप सरळसाधे होते. प्रत्येक सामना आम्ही कोणत्याची दबाव किंवा भीतीखाली न येत खेळलो. प्रत्येक खेळाडूची जबाबदारी एवढी स्पष्ट होती की त्या जबाबदारीमध्ये तो कप्तान होता. त्यातूनच आम्ही एक संघ म्हणून सर्वोत्तम कामगिरी करू शकलो.”