April 29, 2024

मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर होताच दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची भावनिक पोस्ट

पुणे, १४ मार्च २०२४ : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पक्ष कार्यालयापुढे जोरदार जल्लोष करण्यात आलेला आहे. मोहोळ यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरलेला असताना दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मित्राला शुभेच्छा देताना भावनिक पोस्ट शेअर केली. यामध्ये पुण्याला सुसंस्कृत खासदार मिळावा ही अपेक्षा आहे. त्यासोबत पुढच्या पंचवीस वर्षासाठी पुण्याला खंबीर नेतृत्व मिळाले आहे अशा शब्दात कौतुक केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीचे वारे देशात वाहत आहेत. आचारसंहिता अद्याप जाहीर झालेले नसले तरी राजकीय पक्षांकडून जागावाटपांची आणि उमेदवारी निश्चित करण्याचे खलबते सुरू आहेत. भाजपने बुधवारी सायंकाळी महाराष्ट्रातील वीस जागांवरील उमेदवार जाहीर केले. यामध्ये पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर मैदानात उतरणार की मोहन जोशी याची उत्सुकता निर्माण झालेली आहे. मोहोळ यांची उमेदवारी जाहीर होताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी याचे स्वागत केले. त्याचवेळी मोहोळ यांचा मित्र दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील फेसबूक वर पोस्ट शेअर करत मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या.
तरडे यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यानी म्हटलं आहे की, मित्रवर्य मुरलीधर खूप शुभेच्छा. सांस्कृतिक पुण्याला सुसंस्कृत खासदार मिळावा ही प्रत्येक पुणेकराची ईच्छा पूर्ण होण्याच्या दृष्टीने आज पहिलं पाऊल पडलं. मुरलीधर मोहोळ प्रत्येक पुणेकराची पहीली पसंती असेल यात शंका नाही. कारण पुण्याचा महापौर असताना आमच्या या मित्रानं कोरोना काळात कुटुंब जपावं तसं अख्खं पुणे शहर जपलं. त्यामुळे आता देशासाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पुणेकर त्याला विक्रमी मताधिक्क्याने मोदींचा शिलेदार म्हणून दिल्लीला पाठवतील. रांगड्या मातीतला हा देखणा मुरलीधर त्याच्या आक्रमक कामाबरोबरच लाघवी स्वभावासाठीसुध्दा प्रसिद्ध आहे. त्याचं वय पहाता पुढची २५ वर्षे पुण्याला खंबीर नेतृत्वाचा हंबीर सरसेनापती मिळाला असच वाटतंय.