May 17, 2024

बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेसाठी क्रेडाई कटिबद्ध – जे पी श्रॉफ

पुणे, दि. २० फेब्रुवारी, २०२४ : बांधकाम कामगार हा बांधकाम उद्योग क्षेत्रासोबतच समाजाचा देखील एक महत्त्वपूर्ण घटक असून क्रेडाई पुणे मेट्रो सारख्या संस्था या कायमच बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन क्रेडाईच्या कुशल उपक्रमाचे अध्यक्ष जे पी श्रॉफ यांनी केले.

नुकतेच क्रेडाई पुणे मेट्रोच्या कॅम्प येथील न्यूक्लीअस मॉलमधील मध्यवर्ती कार्यालयात बांधकाम कामागारांसाठीच्या मोफत प्रथमोपचार आणि कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन अर्थात सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी श्रॉफ बोलत होते.

कामगार कल्याण समितेच्या निमंत्रक सपना राठी, ए बी क्लिनिकचे डॉ देवेंद्र भोसले, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका उर्मिला जुल्का, कामगार अधिकारी समीर पारखी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या प्रशिक्षणाद्वारे इलेक्ट्रिक शॉक, प्रकल्पस्थळी कामगारांना झालेल्या जखमा, रक्तस्त्राव, अपघात यांवर आवश्यक प्रथमोपचार तंत्र आणि सीपीआर देताना लक्षात घ्यावयाच्या बाबी यांचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकांद्वारे देण्यात आले.

हा प्रशिक्षण कार्यक्रम बांधकाम प्रकल्पावरील कर्मचारी व कामगारांना येऊ शकणाऱ्या संभाव्य धोके आणि आपत्कालीन परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी खास डिझाईन केला गेला असून याचा उपयोग प्राथमिक उपचार करताना नक्की होईल असा विश्वास यावेळी श्रॉफ यांनी व्यक्त केला. अशा प्रकारे एखादे कौशल्य आत्मसात केल्यास कोणत्याही व्यक्तीला याचा फायदा तातडीच्या अपघातजन्य परिस्थितीत होऊ शकेल, असेही श्रॉफ यांनी सांगितले.

बांधकाम कामगारांच्या कल्याणाचा विचार करीत क्रेडाईच्या वतीने अशा प्रकारे पहिल्यांदाच असा कार्यक्रम घेण्यात येत आहे. नजीकच्या भविष्यात कमीत कमी पाच हजार ऑफिसर्स आणि कामगारांपर्यंत हा प्रशिक्षण कार्यक्रम पोहचविण्याचा आमचा मानस आहे, असे यावेळी सपना राठी यांनी स्पष्ट केले.

या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी बांधकाम व्यवसायिक सभासदांनी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन देखील क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार कल्याण आयोगाच्या रश्मी लोढा यांनी केले.