June 14, 2024

महाराष्ट्र प्रिमियर लीग(एमपीएल)मध्ये नौशाद शेख ठरला महागडा खेळाडू

पुणे , ६ जून ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीगसाठी (एमपीएल) मंगळवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात नौशाद शेख हा सर्वांत महागडा क्रिकेटपटू ठरला. कोल्हापूर टस्कर्सने नौशादला ६ लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली.
एमपीएलच्या शिखर समितीने या वेळी सहभागी संघांची नावेही निश्चित केली. सुहाना मसालेवालेंचा पुणे संघ पुणेरी बाप्पा नावाने ओळखला जाईल. ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू असेल. पुनित बाल समुहाचा संघ कोल्हापूर टस्कर्स, ईगल इन्फ्रा इंडियाचा संघ ईगल नाशिक टायटन्स, वेंकटेश्वरा इंडस्ट्रिजचा संघ छत्रपती संभाजी किंग्ज, जेटस सिंथेसिसचा संघ रत्नागिरी जेटस, कपिल सन्सचा संघ सोलापूर रॉयल्स अशा नावाने ओळखला जाईल.
खेळाडूंची लिलाव प्रक्रिया आज पार पडली. या वेळी कोल्हापूर टस्कर्सने नौशादला सर्वाधिक ६ लाख रुपयाची बोली लावून खरेदी केले. त्यानंतर दिव्यांग हिंगणेकरला रत्नागिरी जेटसने ४ लाख ६० हजार रुपयांची बोली लावली. साहिल औताडे (३ लाख ८० हजार), अंकित बावणे (२ लाख ८० हजार) या खेळाडूंनाही रत्नागिरीने मिळविले. सोलापूरने सत्यजित बच्छावला ४ लाक ६० हजार रुपयांना खरेदी केले. शमशुझमा काझीला (२ लाख ८० हजार) छत्रपती संभाजीनगर किंग्ज, सिद्धेश वीरला (२ लाख ६० हजार) ईगल नाशिक टायटन्सने, आशय पालकर आणि कौशल तांबेला (प्रत्येकी २ लाख ४० हजार) देखिल नाशिकने खरेदी केली. पुणेरी बाप्पा संघाने सुरज शिंदेसाठी २ लाख ४० हजार, तर रोहन दामलेसाठी २ लाक रुपयांची बोली लावली.
लिलावासाठी ३०० हून अधिक खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये अ गटात रणजी करंडक खेळाडूंचा समावेश होता. त्यांची ६० हजार ही पायाभूत रक्कम निश्चित करण्यात आली होती. १९ वर्षांखालील आणि ब गटातील खेळाडूंसाठी ४० हजार रुपये किंमत ठरविण्यात आली होती. क गटासाठी २० हजार रुपये ही पायाभूत किंमत होती. खेळाडूंच्या खरेदीसाठी सहाही फ्रॅंचाईजींना २० लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली होती. फ्रॅंचाईजींना संघात १६ खेळाडूंचा समावेश करायचा होता. यामध्ये १९ वर्षांखालील दोन खेळाडू असणे अनिवार्य होते. १९ वर्षांखालील गटातून सचिन धस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोल्हापूर संघाने सचिनसाठी १ लाख ५० हजाराची बोली लावली.
रुतुराज गायकवाड (पुणेरी बाप्पा), केदार जाधव (कोल्हापूर टस्कर्स); राहुल त्रि[पाठी (ईगल नाशिक टायटन्स) राजवर्धन हंगरगेकर (छत्रपती संभाजी किंग्स, अझीम काझी (रत्नागिरी जेट्स), विकी ओत्सवाल (सोलापूर रॉयल्स) यांना यापूर्वीच आयकॉन खेळाडू म्हणून नामांकित करण्यात आले आहे.
एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, लिलावात खेळाडूंना मिळालेल्या बोलीवरून त्यांचा दर्जा अधोरेखित केला जाऊ नये. आमच्यासाठी प्रत्येक खेळाडू अमूल्य आहे. एमपीएलमुळे महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. यामुळे भविष्यात आयपीएल आणि अन्य भारतीय संघांतून महाराष्ट्राचे अधिक खेळाडू खेळताना दिसतील असा विश्वास वाटते. एमपीएलमधून मिळणारा निधी हा क्रिकेटच्या प्रोत्साहनासाठीच वापरला जाणार आहे. यामुळे एमसीएच्या कार्यकक्षेतील २१ जिल्ह्यांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असेही रोहित पवार म्हणाले.
एमपीएल १५ जून ते २९ जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानात खेळविली जाणार असून, या दरम्यान महिलांच्या प्रदर्शनीय सामन्यांचेही आयोजन करण्यात येणार आहे.