April 29, 2024

येत्या ८ ते १० मार्च दरम्यान ‘नादमुद्रा’ महोत्सवाचे आयोजन

पुणे, दि.  मार्च, २०२४ : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार, प्रसार व्हावा या उद्देशाने पुण्यातील अल्फा इव्हेंटसच्या वतीने येत्या शुक्रवार दि ८ मार्च ते रविवार दि १० मार्च दरम्यान कर्वेनगर येथील डी पी रस्त्यावरील केशवबाग येथे सायं ६ ते रात्री १० या वेळेत नादमुद्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल.

महोत्सवाची सुरुवात शुक्रवार दि ८ मार्च रोजी सायं ६ वाजता पं विनायक तोरवी आणि पं व्यंकटेश कुमार यांचे शिष्य असलेले धनंजय हेगडे यांच्या गायनाने होईल. यानंतर ‘ऋतुसंहार’ हा विशेष कार्यक्रम होईल. यामध्ये पं भास्करबुवा जोशी व विदुषी मीरा पणशीकर यांची शिष्या अपर्णा पणशीकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे शिष्य पं रघुनंदन पणशीकर आणि पं रोहिणी भाटे यांची शिष्या व सुप्रसिद्ध नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांचा सहभाग असेल. ‘ऋतुसंहार’ या कार्यक्रमाची संकल्पना अपर्णा पणशीकर यांची असून महाकवी कालिदासांचे विविध ऋतूतील काव्य यांचे बंदिशरूपाने त्यांनी एकत्रीकरण केले असून ते संगीतबद्धही केले आहे. हेच काव्य आपल्या गायनाद्वारे अपर्णा पणशीकर आणि पं रघुनंदन पणशीकर प्रस्तुत करतील तर शर्वरी जमेनीस यावर नृत्य सादर करतील.

भेंडी बझार घराण्यातील तरुण सतारवादक, उस्ताद मोहसीन आली खान यांचे सुपुत्र व शिष्य असलेल्या मेहताब अली नियाझी यांच्या सतारवादनाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात होईल. तर दुसऱ्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायिका विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्या सुमधुर गायनाने होईल.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात अपर्णा पणशीकर यांच्या गायनाने होईल तर पद्मश्री पं व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.