May 5, 2024

पायाभूत टेनिस प्रशिक्षण उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी पीएमडीटीएचा टेनिस प्रीमियर लीगशी सहकार्य करार

पुणे, 30 मार्च 2024: पुणे शहर आणि जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर गुणवान युवा खेळाडूंना आणि पायाभूत स्तरावर प्रशिक्षण उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटने(पीएमडीटीए)ने टेनिस प्रीमियर लीग (टीपीएल)शी सहकार्य करार केला आहे.

टेनिस प्रीमियर लीगने आपल्या देशव्यापी रेस टू गोल्ड (आरटीसी) या उपक्रमाचा एक भाग म्हणून या कराराची घोषणा केली असून देशातील प्रतिभाशाली व गुणवान टेनिसपटू शोधून त्यांना टेनिस क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडविण्यासाठी या माध्यमातून पाठिंबा देण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे लक्ष्य केवळ गुणवान खेळाडू शोधणे एवढेच नसून त्या खेळाडूंना गरज असेल तेवढा काळ वर्षांमागून अनेक वर्षे प्रशिक्षण व सर्व सुविधा प्रदान करुन भारतीय टेनिस क्षेत्रात एक प्रतिभाशाली व यशस्वी खेळाडूंची पिढी तयार करणे, असे असेल.

सध्या तरी पुण्यातील उदयोन्मुख गुणवान युवा खेळाडूंना शोधून त्यांना सर्वोतोपरी पाठिंबा देणे आणि विविध वयोगटासाठी मोठ्या प्रमाणावर टेनिस स्पर्धा आयोजित करण्यासाठी मदत करणे याकरिता टेनिस प्रीमियर लीग व पीएमडीटीए एकत्रितपणे काम करणार आहेत.

यासाठी पीएमडीटीएने याआधी आखलेले एक वर्ष मुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम कमालीचे यशस्वी ठरले असून त्या माध्यमातून काही अफलातून खेळाडू मिळाले आहेत. टेनिस प्रीमियर लीगच्या एकंदर कार्यपद्धतीशी पीएमडीटीएचा हा कार्यक्रम मिळताजुळता असून त्यामुळे तळागाळात गुणवान खेळाडू, निराधार किंवा आधाराविना राहणार नाहीत.

या उपक्रमाप्रमाणे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा टीपीएल आणि पीएमडीटीए यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करणार असुन या स्पर्धांचा फायदा खेळाडूंना जिल्हास्तरीय मानांकन उंचावण्यासाठी आणि आरटीसी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी होणार आहे.

ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विशेष गटात निवड होण्यासाठी खेळाडूंना जिल्हा पातळीवरील सर्व स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागणार आहे. या स्पर्धांमधील कामगिरीच्या निकषावर 72 खेळाडूंचा एक गट निवडण्यात येणार आहे.

या खेळाडूंना प्रत्येकी 75000रुपये मूल्याची शिष्यवृत्ती मिळणार असून त्यात आधुनिक टेनिस रॅकेट, व्यावसायिक किट बॅग, दर्जेदार टेनिस शुज आणि अन्य साधनासह टेनिस प्रीमियर लीग मध्ये खेळण्याचा अनुभव याचा समावेश आहे.

या कराराचा एक भाग म्हणून पीएमडीटीए आणि टीपीएल एक स्पर्धा मालिका आयोजित करणार असून त्यांतील पहिली स्पर्धा स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर 5 ते 7 एप्रिल दरम्यान पुरूष व महिला एकेरी व दुहेरी या गटात होणार आहे. पाठोपाठ 13 व 14एप्रिल रोजी याच मैदानावर 16 व 18 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा पार पडणार आहे.

दरम्यान टीपीएलने स्वतःचे मोबाईल ऍप लॉन्च केले असून या आधुनिक उपक्रमाच्या साहाय्याने संपुर्ण देशभर होणाऱ्या स्पर्धांचा आढावा घेता येणार आहे. या टीपीएल ऍपमुळे संपुर्ण देशभरातील टेनिसपटूंचा परिवार जोडला जाणार असून एकमेकांशी संवाद साधून खेळाडूंच्या प्रगतीचा पाठ पुरावा करणे शक्य होणार आहे. भारतातील सर्व राज्यांमधील 100 हून अधिक टेनिस अकादमीशी हे ऍप जोडले गेले आहे.

पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, पीएमडीटीए आणि टीपीएल यांच्यातील सहकार्य हे पुण्याबरोबरच नजीकच्या परिसरातील ज्युनिअर सर्किटसाठी ही आनंदाची बाब आहे. या स्पर्धा मालिकेमुळे खेळाडूंमधील स्पर्धात्मकता वाढणार असून त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील खेळाडूंचा दर्जा उंचावणार आहे.

ते पुढे म्हणाले की, या उपक्रमामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक असून त्यामुळे काळाच्या कसोटीवरही आम्ही यशस्वी होऊ आणि महत्वाचे म्हणजे काही दर्जेदार खेळाडू निर्माण करून देशाची मान उंचावण्यात यशस्वी ठरू, असा विश्वास आम्हांला वाटतो.

गेल्या पाच वर्षाहून अधिक काळात आम्हांला पुण्यातील गुणवान युवा खेळाडूंमध्ये टेनिसबाबत खूपच रस निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. या खेळाडूंना मदत करणे शक्य झाल्याचा आणि करिअरची दारे उघडण्यासाठी त्यांना मदत करता आल्याचा आम्हाला आनंद होत आहे.

टेनिस प्रीमियर लीगचे सह संस्थापक कुणाल ठाकुर म्हणाले की, गुणवान खेळाडू शोधून तसेच त्यांना प्रशिक्षण देऊन उदयोन्मुख खेळाडूंना अधिकाधिक संधी देणे हेच टीपीएलचे लक्ष्य आहे. पीएमडीटीएशी झालेल्या करारामुळे हे लक्ष्य साध्य करण्याबरोबरच सर्वोच्च स्तरावर यशस्वी होणारे खेळाडू घडविणे आम्हाला शक्य होईल.

टेनिस प्रीमियर लीगचे सह संस्थापक मृणाल जैन म्हणाले की, या सहकार्य कराराच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे पुण्यातील टेनिसच्या पायाभूत स्वरूपातच बदलून घडून येणार असून या स्पर्धांमधून टेनिस प्रीमियर लीगसाठी सुद्धा गुणवान खेळाडू निश्चितच मिळू शकतील असा आम्हाला विश्वास वाटतो.