April 29, 2024

५७ दिवसानंतर पुण्यात होणार मतदान

पुणे, १६ मार्च २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभेची आचारसंहिता जाहीर केली सात टप्प्यांमध्ये देशात मतदान होणार असून चार जून रोजी निकाल जाहीर केले जाणार आहे. प्रचंड मोठी आणि वेळ खाऊ अशी ही निवडणूक प्रक्रिया असून पुणे लोकसभा मतदार संघात तब्बल ५७ दिवसानंतर १३ मे रोजी मतदान होणार आहे. तर उमेदवाराला प्रचारासाठी ५५ दिवसाचा कालावधी मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची आचारसंहिता कधी लागणार याची चर्चा रंगली होती. अखेर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आचारसंहिता जाहीर केली. देशात १९ एप्रिल, २७ एप्रिल, ७ मे, १३, मे २०, मे २५ मे आणि एक जून या सात टप्प्यात मतदान घेण्याचा निर्णय केलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया खूप आठवडे चालणार आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे.पुणे शहराचा विचार करता पुण्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. तसेच शिरूर आणि मावळ या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये देखील १३ मे रोजी मतदान होईल.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. काँग्रेसने अद्याप त्यांचा उमेदवार जाहीर केलेला नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तर्फे डाॅ. अमोल कोल्हे, बारामती मध्ये सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. या दोन मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. तर मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकासआघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. मुरलीधर मोहोळ, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी त्यांचा प्रचार सुरू केलेला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सात तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सुळे यांना प्रचारासाठी ४९ दिवस मिळालेले आहेत. तर मोहोळ आणि कोल्हे यांना ५५ दिवस प्रचारासाठी मिळालेले आहेत. तर त्यांच्या मतदानासाठी ५७ दिवस चा कालावधी आहे. जवळपास दोन महिन्यानंतर मतदान होणार असल्याने या काळात होणारा प्रचंड खर्च आणि कार्यकर्त्यांना टिकवून ठेवणे मोठे आव्हान सर्वच पक्षांपुढे आहे.