May 6, 2024

पुणे मेट्रो लाईन ३ साठी ट्रेन इंजिन आणि बोगींच्या निर्मितीला सुरवात

पुणे/चेन्नई/श्री सिटी, दिनांक ०३ मार्च २०२३: ‘पुणेरी मेट्रो’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या पुणे मेट्रो लाईन ३ साठी मेट्रो ट्रेनचे इंजिन आणि बोगींच्या निर्मितीला आज (शुक्रवार ३ मार्च) पासून प्रारंभ करण्यात आला आहे. फ्रान्स येथील ‘अलस्टॉम’ कंपनीला या उत्पादनाचे कंत्राट देण्यात आले असून चेन्नईजवळील ‘श्री सिटी’ येथील अलस्टॉमच्या कारखान्यात ‘मेक इन इंडिया’ धोरणाअंतर्गत या गाड्यांचे उत्पादन होणार आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (पीएमआरडीए) प्रणित पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचे काम शाश्वत पद्धतीने प्रगतीपथावर आहे. या मार्गावरील बांधकाम विषयक कामकाज वेगाने पूर्ण होत असल्याने आता प्रत्यक्ष मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे विकसक असलेल्या पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आलोक कपूर यांच्या हस्ते आज श्री सिटी येथे यंत्रपूजा करून इंजिन व बोगींच्या उत्पादनाला ‘हिरवा झेंडा’ दाखवण्यात आला. ‘पीआयटीसीएमआरएल’च्या संचालिका व व्यवसाय प्रमुख नेहा पंडित; ‘पीआयटीसीएमआरएल’चे प्रकल्प यंत्रणा प्रमुख एल. एन. प्रसाद तसेच अलस्टॉम ट्रान्सपोर्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार सैनी आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आलोक कपूर म्हणाले, “मेट्रो ट्रेनच्या निर्मितीमध्ये अग्रेसर असणाऱ्या जागतिक ख्यातीच्या अलस्टॉम कंपनीला ‘पुणेरी मेट्रो’च्या निर्मितीमध्ये सहभागी करून घेताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पुणे मेट्रो लाईन ३ च्या मार्गावरील मेट्रो ट्रेनचे इंजिन व बोगी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरुन खास भारतीय प्रवाशांसाठी, भारतीय कारखान्यांमध्येच निर्माण करण्यात येत आहेत. त्यामुळे, पुणे मेट्रो लाईन ३ ही ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे आदर्श उदाहरण ठरेल, आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ धोरणाला बळकट करणारी असेल, यात आम्हाला शंका नाही.”

“हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील प्रवाशांना उत्कृष्ट दर्जाच्या, सुखद व सुरक्षित प्रवासाची अनुभूती देण्यासाठी पुणे मेट्रो लाईन ३ च्या ट्रेन आता आकाराला येत आहेत. या मार्गासाठी अलस्टॉम कंपनीला आम्ही एकूण २२ गाड्यांच्या निर्मितीचे कंत्राट दिले आहे. यातील प्रत्येक गाडी ही अद्ययावत तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहे. अतिशय महत्वाच्या मार्गावरील ही मेट्रो ट्रेन वाहतूक ही पुणेकरांची दैनंदिन प्रवासाची अनुभूती समृद्ध करणारी असेल, असे आम्हाला वाटते,” असे ‘पीआयटीसीएमआरएल’च्या संचालिका नेहा पंडित यांनी सांगितले.

हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती व्यवसाय केंद्राशी जोडणारी पुणे मेट्रो लाईन ३ ही महत्वाची मार्गिका आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या गाड्या प्रवाशांना जलद, वैविध्यपूर्ण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण प्रवासाची सोय उपलब्ध करून देणार आहेत. या ट्रेनचे इंजिन आणि बोगी निर्मितीचे काम देखील वेगाने पूर्ण करून, लवकरच त्यांची वैशिष्ट्ये उलगडून दाखविणारी ‘पहिली झलक’ पुणेकरांसमोर सादर करण्याचा पुणे मेट्रो लाईन ३च्या विकसकांचा मानस आहे.

पुणे मेट्रो लाईन ३ बाबत माहिती:

पुणे मेट्रो लाईन ३ हा हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) प्रकल्प आहे, जो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) द्वारे टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स (Siemens Project Ventures GmbH) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे.