July 27, 2024

पुणे: शहरातील ई-टॉयलेट्स तातडीने दुरुस्त करण्यात यावीत, आयुक्तांनी काढले दुरुस्तीचे आदेश

पुणे, १२/०४/२०२३: शहरातील अनेक ई-टॉयलेट्स त्यांची देखभाल नसल्याने बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. ई-टॉयलेट्सची तातडीने
दुरुस्ती करुन ती वापरण्यायोग्य करण्यात यावीत, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली. आयुक्तांनीही लगेच दुरुस्तीचे आदेश काढले.

महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमवेत पुणे शहर व शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील विविध प्रलंबित विषयांबाबत आमदार शिरोळे यांनी आज (बुधवारी) सविस्तर बैठक घेतली. यावेळेस त्यांनी शहरातील ई-टॉयलेट्सचा प्रश्न मांडला. बंद असलेली ई-टॉयलेट्स चालू करावीत, असे सुचविले.

वस्ती भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील गैरसोयींची प्रत्यक्ष पाहणी करून ही स्वच्छतागृहे नीटनेटकी, स्वच्छ व सर्व सुविधांयुक्त ठेवणे, तसेच शिवाजीनगर मतदारसंघातील कोणत्याही व्यक्तीची सार्वजनिक स्वच्छतागृहांबाबत कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये प्रामुख्याने पाणी, ड्रेनेज व्यवस्था, विद्युत व्यवस्था, स्वच्छता, दुरुस्ती अशा विविध उपाययोजना कराव्यात, असे आमदार शिरोळे यांनी आयुक्तांना सांगितले. या मागणीला आयुक्तांनी अनुकूल प्रतिसाद दिला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२ मध्ये दिनांक ८ मार्च २०२२ रोजी विधानसभेत मी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांमधील जलपर्णीच्या त्रासासंबंधीची लक्षवेधी मांडली होती. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीतील जलपर्णी हटविण्यासाठी जैविक पद्धतीचा वापर करण्यात आला होता. याच धर्तीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील जलपर्णी हटवणेबाबत पुणे महानगरपालिकेकडून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिले, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी सांगितली.

नदीकाठच्या धार्मिक स्थळांनी निर्माल्य तसेच मूर्तींवर प्रदान केलेले इतर साहित्य, सजावटीचे साहित्य इत्यादीची जबाबदारी स्वतः घ्यावी. या सर्व वस्तूंचे विलगीकरण करून ओले निर्माल्य धार्मिक स्थळांच्या जागेतच जिरवावे. यामुळे आपल्या नद्या व धार्मिक स्थळे स्वच्छ व सुंदर राहतील. असे म्हणणे आमदार शिरोळे यांनी मांडले. याबाबत पुणे महानगरपालिकेकडून सीएसआर फंडातून याकरीता तरतूद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

डेक्कन, येथील धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांच्या स्मारकावरील मूर्तीची पूर्णप्रकीया (स्क्रॅपिंग) करून डागडुजी लवकरात लवकर करावी, असेही आमदार शिरोळे यांनी आयुक्तांना सुचविले.

शहरातील अस्तित्वात असलेल्या विहिरींचे सर्वेक्षण व संरक्षण व नवीन विहिरींचे संवर्धनासाठी महापालिकेने धोरण ठरवावे. आळंदी पंढरपूर पालखी मार्गावरती येरवडा येथे उड्डाणपूल बांधावा किंवा ग्रेड सेप्रेटर करावा, मोठ्या रस्त्यांच्या प्रकल्पांच्या कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बॉटलनेक समितीची स्थापना करावी, औंध कुटी रूग्णालयामध्ये सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, संगमवाडी टाकीचे काम पूर्ण करावे, खडकी भागातील पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदलण्यात याव्यात, अशा मागण्याही आमदार शिरोळे यांनी बैठकीत केल्या.