June 14, 2024

पुणे: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या तत्कालीन उपायुक्तावर अपसंपदेप्रकरणी गुन्हा दाखल, 1 कोटी 28 लाखांची अधीकची आढळली संपत्ती

पुणे, १४/०७/२०२३: उत्पन्ना पेक्षा अधिकची 47 टक्के म्हणजे 1 कोटी 28 लाख 95 हजारांची संपत्ती बाळगल्याप्रकरणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य उपायुक्त नितीन चंद्रकांत ढगे यांच्यासह त्याची पत्नी प्रतिभा ढगे (दोघेही रा. रहेजा गार्डन, वानवडी) याच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) हा गुन्हा दाखल केला आहे.

जात प्रमाणपत्र पडताळणी करून ते वैध करण्याकरीता 8 लाखांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1 लाख 90 हजारांची लाच स्विकारल्या प्रकरणातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य नितीन चंद्रकांत ढगे याला याला ऑक्टोंबर 2021 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली होती. यानंतर त्याच्या घर झडतीमध्ये तब्बल 1 कोटी 28 लाख 49 हजारांचे गबाड सापडले होते. या सापळ्यानंतर करण्यात आलेल्या चौकशी अंती ढगे याच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा 1 कोटी 28 लाख 49 हजारांची जास्त संपत्ती बाळगल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याने ही संपत्ती भ्रष्ट मार्गाने कमविल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. तर त्याची पत्नी प्रतिभा ढगे हिने अपप्रेरणा दिल्याने तसेच खोटी माहिती कागदपत्रामध्ये भरून शासनाची फसवणूक केल्याचे दाखल गुन्ह्यात म्हटले आहे. ही कारवाई एसीबीेचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे, उपअधीक्षक नितीन जाधव, उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांनी केली.