September 14, 2024

पुणे: दहशत माजविणार्‍या दोघाविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून २३ गुंड स्थानबद्ध

पुणे, दि. ५/०७/२०२३: शहरात दहशत माजविणार्‍या दोघा गुंडांविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली आहे. त्यांची रवानगी नागपूर आणि अमरावती कारागृहात करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील २३ गुंडांविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.

वनराज महेंद्र जाधव (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), महेश उर्फ दाद्या उर्फ रोहित कुंडलिक मोरे (वय २१, रा. वडगाव राजा गणपती मंदिरामागे, वडगाव बुद्रुक) अशी स्थानबद्ध केलेल्या गुंडांची नावे आहेत.

मोरे याला एक वर्षांसाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर जाधव याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. मोरेविरुद्ध खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचार्‍यावर हल्ला, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारहाण करणे असे गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी पाठविला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंजूरी दिली. तर येरवडा भागातील लक्ष्मीनगर परिसरातील गुंड जाधवविरुद्ध खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचार्‍याला मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. येरवडा पोलीस ठआण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. पोलीस आयुक्तांनी प्रस्तावाला मंजुरी देऊन त्याची रवानगी नागपूर कारागृहात केली.