पुणे, ०५/०७/२०२३: पिंपरीतील सेवा विकास बँकेचे माजी संचालक, माजी उपमहापौर अमर मुलचंदानी यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. मुंबईतील विशेष न्यायालयाने मूलचंदानी यांना शुक्रवारपर्यंत (७ जुलै) ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पिंपरीतील सेवा विकास बँकेचे माजी संचालक अमर मुलचंदानी यांच्या विरुद्ध ईडीने २८ जानेवारी रोजी कारवाई केली होती. कर्ज प्रकरणात मुलचंदानी, तसेच अन्य संचालकांनी केलेल्या ४२९ कोटी सहा लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मुलचंदानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या निवासस्थानी, तसेच कार्यालयावर ईडीने छापे टाकले होते. कारवाईस असहकार्य केल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा मुलचंदानी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा ईडीने दाखल केला होता. त्यानंतर मुलचंदानी, रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय आरहाना, तसेच सागर सूर्यवंशी, खेमचंद भोजवानी आणि त्यांच्या कुटुंबीयांची १२१ कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) जप्त केली होती.
मुलचंदानी यांनी बेकायदा कर्ज मंजूर करून गैरव्यवहार केला होता. रोझरी स्कूलचे विनय आराहाना, सागर सूर्यवंशी, खेमचंद भोजवानी यांनी दि सेवा विकास बँकेकडून कर्ज घेतले होते. मुलचंदानी यांनी केलेल्या गैरव्यवहारात आराहाना, सूर्यवंशी, भोजवानी सामील असल्याचे ईडीच्या तपासात उघडकीस आल्यानंतर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली होती. ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मुलचंदानी यांना अटक करण्यात आली. ईडीच्या पथकाने त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (७ जुलै) कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
More Stories
पुणे: कल्पतरू हार्मनी सीएचएसमध्ये २०० किलोवॅट सौर प्रकल्पाचे उद्घाटन
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांना गती देणारा नवा टप्पा म्हणजे ‘चऱ्होली’ व ‘माण’ ई-बस डेपोः अजित पवार
पुणे: भक्तीशक्ती चौक ते पीसीएमसी मेट्रो मार्गिकेतील पहिले ‘सेगमेंट’ बसवण्याचे काम सुरु