December 14, 2024

पुणे: लोणावळ्यातील खाणीत बुडून मुंबईतील दोन पर्यटकांचा मृत्यू

लोणावळा, ०९/०७/२०२३: लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली गावात खाणीतील पाण्यात बुडून मुंबईतील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

प्रियांक पानचंद व्होरा (वय ३५, रा. पवई, मुंबई), विजय सुभाष यादव (वय ३५, रा. घाटकोपर, मुंबई) अशी मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांची नावे आहेत. प्रियांक, विजय आणि त्यांचे मित्र लोणावळा परिसरात शनिवारी (८ जुलै) वर्षाबिहारासाठी आले होते. लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली गावातील खाणीत पाणी आहे.

सायंकाळी सातच्या सुमारास खाणीतील पाण्यात प्रियांक, विजय, जेनिया वियागस उतरले. खाणीतील दगडावरुन त्यांचा पाय घसरला आणि तिघे जण पाण्यात बुडाले. तिघे जण खाणीतील पाण्यात बुडाल्याचे मित्रांनी पाहिले. त्यांनी आरडओरडा केला.

ग्रामस्थांनी तिघांना तातडीने पाण्यातून बाहेर काढले. नाकातोंडात पाणी शिरल्याने प्रियांक आणि विजयचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले. या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद लोणावळा पोलिसांनी केली आहे. पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर पवार तपास करत आहेत.