May 7, 2024

पुणे: बाजार समितीच्या अधिकाऱ्यांवर दाखल गुन्हे, मागे घेण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा

पुणे, १७/०४/२०२३: मार्केट यार्डातील बाजार आवारात बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई केल्याने बाजार समितीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी बाजार आवारातील अडते, कामगार, हमालांकडून सोमवारी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.

सहा महिन्यांपूर्वी मार्केट यार्डाच्या आवारात बेकायदा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या विरुद्ध बाजार समितीच्या प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त घेण्यात आला होता. सहा महिन्यांनंतर मार्केट यार्डात बेकायदा लिंबू विक्री करणाऱ्या महिलेेने जातीवाचक शिवीगाळ तसेच विनयभंग केल्याची तक्रार मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर बाजार समितीचे अधिकारी, अडते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह २० ते २५ जणांच्या विरुद्ध जातीवाचक शिवीगाळ तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने भविष्यात बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास अधिकारी धजावणार नाहीत. बाजार समितीचे अधिकारी आणि अडत्यांवर दाखल केलेले गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी मार्केट यार्ड बाजार आवारातील सर्व घटकांनी सोमवारी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

याबाबत बाजार आवारातील अडते संघटना, व्यापारी संघटनेकडून मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. मार्केट यार्डातील अडते, कामगार, हमाल, तोलणार, टेम्पो चालकांनी सोमवारी काळ्या फिती बांधून कारवाईचा निषेध केला. मार्केट यार्ड पोलीस ठाण्यावर मूक माेर्चा काढण्या आला. मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांना निवेदन देण्यात आले.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध भोसले, ज्येष्ठ अडते गणेश घुले, माजी अध्यक्ष विलास भुजबळ, सचिव करण जाधव, युवराज काची, राहुल कोंढरे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे, कामगार संघटनेचे विशाल केकाणे, संतोष नांगरे, नितीन जामगे, राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी मोर्चात सहभागी झाले होते.