May 2, 2024

पुणे: राज्य राखीव पोलीस दलाच्या लेखी परिक्षेत केली कॉपी; चौघांना अटक, तिघांविरुद्ध गुन्हा

पुणे, दि. २४/०७/२०२३: राज्य राखीव पोलीस बलाच्या लेखी परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करुन गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. ही परिक्षा २३ जुलैला वडगाव बुद्रूक परिसरातील एका महाविद्यालयात घेण्यात येत होती.

योगेश रामसिंग गुसिंगे (वय १९, रा. बोरसर, वैजापूर, संभाजीनगर), संजय सुलाने (वय १९, गोकुळवाडी, गंगापूर, संभाजीनगर), योगेश सुर्यभान जाधव (वय २५, रा. पैठण, संभाजीनगर), लखन उदयसिंग नायमने (वय २१, रा. कात्राबाद संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उपनिरीक्षक अंकुश कुंभार यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १९ भरती प्रक्रियासाठी लेखी परिक्षा घेण्यात येत होती. त्यावेळी आरोपींनी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर केल्याचे दिसून आले. त्याद्वारे कॉपी करुन परिक्षेत पास होण्यासाठी त्यांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चौघाजणांना अटक करण्यात आली. त्यांच्या इतर तीन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करीत आहेत.