पुणे, २२/०७/२०२३: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध न्यायालयाने कारवाईचा बडगा उगारला असून खटल्याच्या कामकाजाला उपस्थित न राहणाऱ्या ७३२ वाहनचालकांविरुद्ध पकड वॉरंट बजाविण्यात आले आहे.
शहर, उपनगरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. एकेरी वाहतूक, हेल्मेट परिधान न करणे, ट्रिपल सीट यासह विविध प्रकारच्या नियमभंग प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. खटल्यांच्या कामाकाजास उपस्थित न राहणाऱ्या संबंधित वाहनचालकांना न्यायालयाने नोटीस बजाविली असून, नोटीशीकडे काणाडोळा करणाऱ्या वाहनचालकांना आता न्यायालयाने दणका दिला आहे. जे वाहनचालक नोटीस बजावूनही न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. अशा वाहनचालकांविरुद्ध पकड वॉरंट (अटक वाॅरंट)जारी करण्यात आले आहे.
मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक विभागाने २०२० या वर्षांपासून नियमांचा भंग केलेल्या वाहनचालकांना खटल्याच्या कामाकाजास उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयीन कामकाजास अनुपस्थित राहणाऱ्या ७३२ वाहनचालकांना पकड वॉरंट बजावण्यात आले आहे. पकड वॉरंट बजावण्यात आलेल्या वाहनचालकांनी आठ दिवसांत मोटार वाहन न्यायालयात उपस्थित राहून खटल्याचा निकाल लावून घेणे आवश्यक आहे. अन्यथा पोलिसांकडून वाहनचालकांना अटक करुन न्यायालयात हजर केले जाईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिला आहे.
More Stories
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘विंग्स फॉर ड्रीम्स’तर्फे पुण्यात निषेध
आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण
पथ विक्रेता कायदा अंमलबजावणी परिषदेस चांगला प्रतिसाद