December 13, 2024

पुणे: फिल्मी स्टाईल ४७ लाखांची रोकड लुटीचा पर्दाफाश, तिघे जाळ्यात

पुणे, २९/०३/२०२३: भरदिवसा मारहाणकरून ४७ लाखंच्या रोकड लुटीप्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे. समर्थ पोलिसांनी याप्रकरणातील मास्टर माईंडला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून २५ लाखांची रोकड जप्त केली आहे. तर, प्रत्यक्षात मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने पकडले आहे.

समर्थ पोलिसांनी ऋषीकेश मोहन गायकवाड (वय २८, रा. बिबवेवाडी) याला अटक केली. तर, गुन्हे शाखेने किरण अशोक पवार व आकाश कपील गोरड (रा. बिबवेवाडी) यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. याबाबत मंगलपुरी गोस्वामी (वय ५५) यांनी तक्रार दिली आहे.नाना पेठेतील आझाद चौकात रोकड लुटीचा थरार सकाळी ११ च्यादरम्यान घडला होता. ही कारवाई परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील पवार, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे, उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार जितु पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

नाना पेठेतील पन्ना एजन्सीची रोकड घेऊन निघालेले कामगार मंगलपुरी यांना नाना पेठेतील आझाद चौकात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दोघांनी दुचाकीला धक्का देऊन कोयत्याच्या धाकाने लुटले होते. त्यांच्याकडील ४७ लाख २६ हजार रुपयांची रोकड लुटून नेण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट एक व समर्थ पोलिसांकडून सुरू होता. यादरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यांना संशयित रिक्षा या भागात फिरत असल्याचे दिसून आले. चार दिवसांपासून हा रिक्षा पन्ना एजन्सीच्या कार्यालय परिसरात फिरताना दिसल्याने संबंधित रिक्षाचा शोध घेतला. त्यावेळी रूषीकेश गायकवाड असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता तो या गुन्ह्यात सहभागी असल्याचे तसेच मास्टर माईंडही असल्याचे समोर आले. चौकशीत त्याने इतर दोघांची नावे सांगितली. त्यानूसार त्याला अटक केली आहे.गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होते. यावेळी युनिट एकच्या पथकाला प्रत्यक्षात लुटमार करणारे किरण पवार व कपील गोरड यांची माहिती मिळाली. त्यानूसार, त्यांना वेगवेगळ्या भागातून पकडले. त्यांच्याकडे सखोल तपास केला जात असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रोकड याची माहिती घेतली जात आहे.

ऋषीकेश हा पुर्वी एका कंपनीमार्फत पन्ना एजन्सीत नोकरीस होता. २०१९ ते ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत येथे नोकरी करत होता. तो सिगारेट सेल्समन म्हणून काम करत होता. त्याने भांडण केल्याने त्याला नोकरीवरून काढले होते. त्यामुळे त्याला एजन्सीबाबत सर्व माहिती होती. एजन्सीची रोकड कधी बँकेत भरणा केली जाते, रोकड किती असते, ही रोकड घेऊन कोण जाते याची माहिती होती.

किरण व आकाश पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रूषीकेश व किरण आणि आकाश एकाच परिसरातील आहेत. ते एकमेकांना ओळखतात. ऋषीकेशने त्यांना रोकड लुटीची कल्पना दिली. त्यांना पैशांचे आमिष दाखविले. त्यानूसार त्यांनी कट रचला. घटनेपुर्वी तिघे रिक्षाने चार दिवस परिसरात फिरले. रोकड लुटीचा फ्लॅन तयार केला. त्यांनी पळून जाण्यासाठी सीसीटीव्ही नसणाऱ्या रस्त्यांची पसंती केली. त्यानूसार रिक्षाने ऋषीकेश रिक्षाने व दोघे दुचाकीवर आले होते. ऋषीकेश हा दोघांना सोडून पसार झाला.