May 19, 2024

पुणे: येरवड्यात सराईतासह टोळक्याचा राडा मी इथला गुंड, ५ हजारांचा हप्ता द्यावा लागेल

पुणे, दि. ०७/०९/२०२३: शहरातील येरवडा परिसरात पुन्हा एकदा सराईतासह टोळक्याने हॉटेलची तोडफोड करीत दहशत माजविली. मी इथला गुंड आहे, मला दर महिन्याला ५ हजारांचा हप्ता द्यावा लागेल. नाहीतर हॉटेल चालवून देणार नाही, असे म्हणत हॉटेल व्यावसायिक महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखांची सोन्याची चेन हिसकावून नेली. ही घटना ६ सप्टेंबरला सकाळी साडेआठच्या सुमारास विमाननगरमध्ये घडली.

अखिल अनिल पालांडे (वय २५, रा. धानोरी) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. ओंकार टिंगरे (वय २६) याच्यासह इतर गुन्हेगारांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने विमाननगरमध्ये जेएमडी फास्ट फुड नावाचे हॉटेल आहे. ६ सप्टेंबरला सराईत अखिल आणि त्याचे साथीदार हॉटेलमध्ये गेले. त्यांनी फिर्यादी महिलेला हॉटेल चालवायचे असल्यास मला, महिन्याला ५ हजारांचा हप्ता द्यावा लागेल. नाहीतर हॉटेल तोडून टाकू अशी धमकी दिली. मी इथला गुंड आहे, असे म्हणत टोळक्याने महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजारांचे सोन्याची चेन हिसकावून नेली. त्यानंतर त्यांच्या हॉटेलची तोडफोड केली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस तपास करीत आहे.

लुटमारनंतर आता खंडणीचे प्रकार
मागील काही दिवसांपासून येरवडा परिसरात गुन्हेगारांकडून नागरिकांना लक्ष्य केले आहे. बसची वाट पाहत असलेल्या जेष्ठाला मारहाण करुन लुटल्याची घटना ताजी असतानाच, टोळक्याने पुन्हा एकदा विमाननगरमध्ये राडा घातल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांकडून गुन्हेगारांविरूद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.