May 19, 2024

पुणे: बिल्डरच्या अकाउटंटद्वारे ६६ लाखांचा ऑनलाईन गंडा, सायबर पोलिसांकडून आरोपीला बिहारमधून बेड्या

पुणे, दि. ७/०९/२०२३ – बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील अकाउटंटला फोन करुन सायबर चोरट्याने मालक असल्याचे भासविले. त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप डीपीवर मालकाचा फोटो वापरून मी मिटींगमध्ये आहे, अर्जंट संबंधत खात्यावर रक्कम वर्ग कर असा मेसेज करीत ऑनलाईनरित्या ६६ लाखांचा गंडा घातला होता. याप्रकरणी आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी बिहारमधून बेड्या ठोकल्या आहेत.

बिशाल कुमार भरत मांझी (वय २१ रा. सिवान, बिहार ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फिर्यादी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात अकाऊंट विभागात काम करतात. आरोपीन त्यांच्या मोबाइलवर फोन करुन कंपनीचे संचालक बोलत असल्याचे भासविले. मी मिटींगमध्ये असून, तातडीने रक्कम पाठवा असा मेसेज त्याने केला. त्यानुसार अकाउटंटने संबंधित बँक खात्यात तब्बल ६६ लाख ४२ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग केले. मात्र, सायबर चोरट्याने वारंवार पैशांची मागणी केल्यामुळे अकाउटंटला संशय आला. त्याने मालकाला फोन करुन खातरजमा केली असता, फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी १८ मे रोजी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर पोलिसांनी आरोपींचा मोबाईल, ईमेल आयडी व पेमेंट करण्यासाठी दिलेल्या लिंकसह बँक खात्यांचा तांत्रिक तपास केला. त्यावेळी आरोपी बिहारमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेउन बिशाल मांझी याला ताब्यात घेतले. ट्रान्झीट रिमांडद्वारे त्याला पुण्यात आणण्यात आले आहे. त्याच्याकडून एक मोबाइल, वेगवेगळ्या कंपनीचे ६ सिमकार्ड जप्त केले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी आर. एन. राजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिनल सुपे-पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, उपनिरीक्षक प्रमोद खरात, वैभव माने, अश्विन कुमकर, शिरीष गावडे, प्रविण राजपुत, राजेश केदारी, दत्तात्रय फुलसुंदर यांनी केली.