May 15, 2024

पुणे: “जिल्हाधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच तळजाई, टेकडी इर्शाळवाडी होण्याची भीती” – बांधकाम थांबविण्याची ठाकरे गटाची मागणी

पुणे, २८ जुलै २०२३ : दरड कोसळून इर्शाळवाडी आणि माळिण ही दोन गावे गायब झाली. शेकडो लोकांचा मृत्यु झाला. आता पुण्यात हिंगणे खुर्द येथे तळजाई टेकडी बेकायदेशीरपणे टेकडीफोड केली जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पण हे सर्व महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे. त्वरित टेकडीफोड थांबविण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.

हिंगणे खुर्द भागात बीडीपी झोन असताना रस्ता बनविण्यासाठी तळजाई टेकडीचा भाग फोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म विभागाने दिलेल्या पत्राद्वारे जागा मालक आणि विकासकांनी नैसर्गिक नाला बुजवत त्या जागी रस्ता तयार केला आहे. भूमाफियांकडून या परिसराचे सपाटीकरण जोरात सुरु असल्यामुळे हा भाग धोकादायक झालेला असून येथे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. माळीण, इर्शाळवाडीसारखी दुर्घटना याठिकाणी घडण्याची भीती व्यक्त करत यासंदर्भात शिवसेनेचे प्रसिद्धीप्रमुख व पर्यावरणप्रेमी अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले. त्यानंतर घरत यांनी महापालिकेकडून माहिती घेतली असता हा पत्रव्यवहार समोर आला. त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले हे पत्र तत्काळ रद्द करावे अशी मागणी घरत यांनी केली आहे .

अनंत घरत म्हणाले, यासंदर्भात बांधकाम विभागाकडून आम्हास मिळालेल्या माहितीनुसार झोन २ चे अधिकारी यांनी सदर टेकडी फोड ची पाहणी केली असताना विकासकांकडून त्यांना जिल्हाधिकारी यांचे रस्ता बनविण्यासाठी चे पत्र दाखविण्यात आले. त्यामुळे कारवाईत अडथळा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आशीर्वादानेच तळजाई टेकडीचा हिंगणे खुर्द चा भाग फोडण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच नैसर्गिक नाला बुजविण्याबरोबर अनधिकृत प्लॉटिंग करण्याचे धाडस जागा मालक आणि विकसक करत आहेत. या विरोधात आम्ही जिल्हाधिऱ्यांना तक्रारी आणि पत्रव्यवहार केला आहे. प्रशासनाला या प्रकरणाचे गांभीर्य नसल्यास वेळप्रसंगी आंदोलन करू तसेच न्यायालयात जाणार असल्याचे घरत म्हणाले.