May 15, 2024

पुणे: पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त, विशेष सुरक्षा पथकाकडून सुरक्षेचा आढावा

पुणे, २९/०७/२०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले विशेष सुरक्षा पथक (एसपीजी), फोर्सवनचे जवान बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे. पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात राहणार आहे. एसपीजीच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला.

पंतप्रधान मोदी यांना एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त पोलीस तसेच प्रशासनाने बंदोबस्ताची आखणी केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, रामनाथ पोकळे, विशेष शाखेचे उपायुक्त पी. राजा आदींनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. विशेष सुरक्षा पथकाने पंतप्रधानाच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. हेलीकाॅप्टर उतरण्याचे ठिकाण (हेलीपॅड), कार्यक्रम स्थळ, तसेच पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे. त्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे.

पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी (१ ऑगस्ट) शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. पंतप्रधान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. स. प. महाविद्यालायाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल मध्यभागातील बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत. स. प. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम निमंत्रितासाठी असणार आहे. हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील मैदानावर विविध विकासकामांचे उद्घाटन केले जाणार आहे. पोलीस मुख्यालयातील कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. तेथे दहा हजार जणांसाठी बैठक व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी यांचा दौरा एकदिवसीय असणार आहे. विमानाने ते लोहगाव येथील हवाई दलाच्या विमानतळावर उतरणार आहे. तेथून ते हेलीकाॅप्टरने शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पोहोचतील. त्यानंतर ते वाहनातून कार्यक्रमस्थळी पोहोचणार आहेत. पंतप्रधानाच्या दौऱ्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या बंदोबस्तास राहणार आहेत. फोर्स वनचे पथके बंदोबस्तास असणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीच्या पथकांकडे असणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.