April 28, 2024

पुणे: सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड, गुंड टोळीविरुद्ध मोक्का कारवाई

पुणे, १२/०८/२०२३: सहकारनगर भागात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत शहरातील ४६ गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कारवाई केली आहे.

दिग्विजय उर्फ पपुल्या तुकाराम वाघमारे (वय २०, रा. रामनगर, वारजे), कमल चक्रबहाद्दुर साह (वय १९, रा. चव्हाणनगर, धनकवडी), भगवान धाकलू खरात (वय २०, रा. श्रमिक वसाहत, कर्वेनगर ), लिंगाप्पा उर्फ नितीन सुरेश गडदे (वय २०, रा. वडार वस्ती, कर्वेनगर), देवीदास बसवराज कोळी (वय १९, रा. कॅनाॅल रस्ता, कर्वेनगर) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. याप्रकरणात दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, तीन आरोपी पसार आहेत.

सहकारनगर भागातील तळजाई वसाहत परिसरात आरोपी वाघमारे आणि साथीदारांनी १९ जून रोजी वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली होती. नागरिकांना शस्त्राचा धाक दाखविला होता. वाघमारे टोळीप्रमुख असून, अल्पवयीन मुलांना पैशांचे आमिष दाखवून आरोपींनी गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले होते. वाघमारे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप देशमाने यांनी तयार केला होता. या प्रस्तावाची पडताळणी अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी केली. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. सहायक आयुक्त नारायण शिरगावकर तपास करत आहेत.