पुणे, दि. २२ फेब्रुवारी, २०२४ : “जगभरात राजस सुकुमारचे शेकडो प्रयोग केले. वेगवेगळ्या संस्कृती, भाषा आणि जनसमूह प्रेक्षक म्हणून लाभले. भाषेची मर्यादा ओलांडत राजस सुकुमारचा आशय सर्वांपर्यंत सहज पोहोचला आणि यातील संतांच्या रचना या ‘अक्षरब्रह्मा’चा साक्षात्कार असल्याचा प्रत्यय येत राहिला, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ नृत्यांगना आणि नृत्यगुरू डॉ. स्वाती दैठणकर यांनी काढले.
प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि गुरू डॉ. स्वाती दैठणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि मराठी संतरचनांवर आधारित असलेल्या ‘राजस सुकुमार’ या डान्स बॅले कार्यक्रमाला २० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत ‘राजस सुकुमार’च्या विशेष प्रयोगाचे आयोजन टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
डॉ. दैठणकर म्हणाल्या, “२० वर्षांपूर्वी २१ फेब्रुवारी रोजी एचएमव्ही सारेगमने ‘राजस सुकुमार’ या कार्यक्रमाच्या व्हीसीडीची निर्मिती केली. २० वर्षांपूर्वी टिळक स्मारक मंदिर येथेच एचएमव्ही सारेगमतर्फे पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते या व्हीसीडीचे प्रकाशन दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले होते. या कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा द्यावा आणि पुन्हा रसिकांना तो अनुभविता यावा, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.”
स्वतः स्वाती दैठणकर यांनी सादरीकरण करताना प्रत्येक संतरचनेचे वैशिष्ट्य, भाव, कथानकांचे संदर्भ स्पष्ट केले. पदलालित्य, अभिनय आणि रचनेचा भावार्थ उलगडत त्यांनी उपस्थिते रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या सादरीकरणाच्या माध्यमातून सामान्य रसिक आणि भरतनाट्यम नृत्यशैली यांच्यात सेतू बांधला गेला. त्यात अंतर किंवा दूरता उरली नाही. ‘राजस सुकुमार’ चे जगभर प्रयोग झाले. संतरचनांमधून संतांच्या आत्मसाक्षात्काराच्या उर्मी उमटल्या आहेत. त्या जगभरातील रसिकांच्या मनाला भिडल्या आणि भावसंवेदना वैश्विक असतात, हा अनुभव आला. शब्द आणि संगीताच्या साथीने हा नृत्याविष्कार सार्थकतेचे समाधान देत आला असल्याचे डॉ दैठणकर म्हणाल्या.
यावेळी डॉ. धनंजय दैठणकर म्हणाले, “संतूरवादक म्हणून मी रचना संगीतबद्ध केल्या होत्या पण संतरचनांसाठी संगीत देणे तेही नृत्याचा विचार करून, ही वेगळी आणि आव्हानात्मक बाब होती. उत्तम टीम मिळाल्याने हे शक्य झाले.”
राजस सुकुमार कार्यक्रमाची संकल्पना डॉ. स्वाती दैठणकर यांची असून त्यांनी स्वत: आणि त्यांच्या २५ शिष्यांनी यावेळी नृत्य सादरीकरण केले. यामध्ये कृष्णाची भूमिका डॉ. स्वाती दैठणकर यांची कन्या आणि शिष्या नुपूर दैठणकर यांनी केली. पं. शिवकुमार शर्मा यांचे ज्येष्ठ शिष्य डॉ धनंजय दैठणकर यांनी कार्यक्रमाला संगीत दिले आहे. याबरोबरच सुप्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी, अनुराधा मराठे यांनी ध्वनिमुद्रित गायन केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात रामदास स्वामी यांच्या गणेश वंदनेने झाली. यानंतर ‘राजस सुकुमार…’, ‘माझा कृष्ण देखिला काय…’, ‘अगा वैकुंठीच्या राया…’, ‘धरोनी दोन्ही रूपे…’, ‘मशि बोलू नको गोविंदा…’, ‘कैवल्याचा अधिकारी…’, ‘अनंता अच्युता श्रीधरा माधवा…’ या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत कान्होपात्रा, संत नामदेव यांच्या रचना नृत्यरुपात सादर झाल्या.
यावेळी भरतनाट्यम नृत्य शैलीतील मार्गमशी समांतर अभंग सादर झाले यासोबतच मूळ शास्त्रीय शैलीशीही रसिकांची मने जोडल्या गेली. या अर्थाने ‘राजस सुकुमार’ने वीस वर्षांपूर्वी एक वेगळेपण रसिकांना दर्शवून दिले हे विशेष.
कार्यक्रमाच्या निमित्ताने या प्रयोगाशी संबंधित सर्व तंत्रज्ञ, कलाकार, साथसंगतकार यांचे विशेष सत्कार रवींद्र दुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. अनुराधा मराठे, सचिन इंगळे, सतारवादक सुधीर फडके यांचे पुत्र रूपक फडके, डॉ. राजेंद्र दूरकर, प्रसाद जोशी, अभिजीत सराफ, के मोहन, लक्ष्मी, बीना इनामदार, किशोर खोजे, रवी पाटील, संगीता शेवते, राजेश वाघ यांचा सन्मान करण्यात आला. नीरजा आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दृकश्राव्य माध्यमातून २० वर्षांपूर्वी झालेल्या प्रकाशन समारंभाची झलकही रसिकांनी अनुभवली.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.