June 24, 2024

उत्तुंग श्रेणीच्या विजीगीषेचे व प्रेरक जगण्याचे लेखक संजीव सबनीस हे मूर्तिमंत उदाहरण

पुणे, दि. ७ जून २०२४ – लेखक संजीव सबनीस हे उत्तुंग श्रेणीच्या विजीगीषेचे आणि प्रेरक जगण्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. निराशेच्या, दुःखाच्या, वेदनेच्या कडेलोटापर्यंत जाऊनही पराकोटीच्या सकारात्मक वृत्तीने आणि दुर्दम्य आत्मविश्वासाने कसे जगावे, याची प्रेरणा ते देत आहेत, असे प्रतिपादन संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि गुरूकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी केले.

पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने ‘एकला चलो रे’ या आत्मचरित्रपर ग्रंथाचे लेखक संजीव सबनीस यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजीव सबनीस यांचा पुरस्कार त्यांच्या पत्नी रजनी सबनीस यांनी स्वीकारला. कर्वे रस्त्यावरील स्वामीकृपा सभागृह येथे झालेल्या पुरस्कार प्रदान समारंभात डॉ. कामत बोलत होते. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त देवदत्त चंदगडकर, अत्रे कट्टाच्या प्रमुख संपदा वागळे, प्रदीप भिडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. रोख रुपये दहा हजार, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि श्रीफळ असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप होते. लेखक संजीव सबनीस आँनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

डॉ. कामत म्हणाले, “अनपेक्षित अपघातामुळे जीवप्रवास संपण्याच्या अवस्थेतून जिद्दीने उभे राहिलेल्या अनोख्या व्यक्तीमत्त्वाचे मराठीमधील एक आगळेवेगळे आत्मकथन, असे सबनीस यांच्या ‘एकला चलो रे’ या ग्रंथाचे वर्णन करावे लागेल. अपघाताच्या निमित्ताने जे वाट्याला आले, त्याचा स्वीकार कसा करायचा, हे सबनीस आपल्या जगण्यातून दाखवत आहेत. सबनीस यांची सकारात्मकता, वैचारिक प्रगल्भता, चिंतनशीलता आणि बुद्धीप्रामाण्यवाद, यामुळे त्यांनी अपघातग्रस्ततेवर मात केली आहे. शारीरिक विकलांगता मान्य करूनही, अंतर्मुख वृत्तीने त्यांनी या परिस्थितीचा स्वीकार कसा केला, हे त्यांच्या लेखनातून समोर येते आणि प्रत्येकाला प्रेरणा देते.”

अतुलनीय आशावाद, व्यासंगी वृत्ती आणि पराकोटीची सकारात्मकता, ही संजीव सबनीस यांची वैशिष्ट्ये असल्याचे देवदत्त चंदगडकर यांनी सांगितले. आमचे सहजीवन आणि सबनीस यांचा सहप्रवास, अखंड सुरू राहील, असे रजनी सबनीस म्हणाल्या.

प्रतिभा वालावलकर यांनी सबनीस यांच्या कार्याचा परिचय करून दिला. संपदा वागळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सबनीस यांच्या ‘एकला चलो रे’ या ग्रंथाचे मर्म उलगडले.

“अपघाताने वाट्याला आलेले एकटेपण ही सबनीसांनी आत्मचिंतनाची संधी मानली आणि सर्व प्रकारच्य प्रतिकूलतेवर मात करणारी सकारात्मकता प्राप्त केली. अपघातग्रस्त झाल्यावर, वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलेली वस्तुस्थिती जाणून घेत सबनीस सकारात्मक संघर्ष करत आहेत. वाचन, संगीत हे छंद जोपासत आहेत. त्यांचा आत्मसंवाद, त्यांच्या पुस्तकातून वाचकांसमोर आला आहे,” असे वागळे म्हणाल्या.

शुभदा वर्तक यांनी सूत्रसंचालन केले तर आरती मोने यांनी आभार मानले,