पुणे, १० जुलै २०२६ : आषाढी वारीच्या निमित्ताने पुणे महापालिका समाज विकास विभाग आणि जान्हवी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण उपक्रम राबविण्यात आला. दि. ९ व १० जुलै २०२६ रोजी पुण्यातील दोन ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये एकूण ३०५ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
दि. ९ जुलै रोजी पुणे महापालिका समाज विकास विभाग व जान्हवी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे स्टेशन येथील दिवस-रात्र निवारा प्रकल्पात आयोजित शिबिरात ५५ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर दि. १० जुलै रोजी भवानी पेठ, पुणे येथे आयोजित शिबिरात आणखी २५० वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे वितरण करण्यात आले.या उपक्रमामध्ये नांदेड, सोलापूर, लातूर, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमधून आलेल्या वारकऱ्यांना किमान पंधरा दिवस पुरेल इतकी आवश्यक औषधे व गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. वेळेवर आरोग्य तपासणी व औषधोपचार मिळाल्यामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
हा समाजोपयोगी उपक्रम पुणे महापालिका समाज विकास विभागाच्या सहकार्याने आणि जान्हवी फौंडेशनचे मार्फत यशस्वीरीत्या पार पडला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी निलेश सोनवणे, अलिम शेख, मुशीद शेख, परमेश्वर बंदुके, ज्ञानेश्वर उघडे, चंदू सूर्यवंशी, आशीष कांबळे आणि किरण कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सिम्बायोसिस कॉलेजचे रायनेल फर्नांडिस यांनी स्वयंसेवक म्हणून सेवा बजावली. अक्षय खागटे पाटील यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले.
वारकऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग आणि जान्हवी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

More Stories
ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे आयोजन येत्या १४ व १५ जुलै रोजी
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे दर्शन