May 20, 2024

महाराष्ट्र राज्य 11 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत 240 खेळाडू सहभागी

पुणे, 26 जुलै, 2023: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य 11 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत राज्यभरातून 240 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा श्री गणेश सभागृह, कर्वे रोड येथे 28 ते 30 जुलै 2023 या कालावधीत होणार आहे. 
 
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे उपाध्यक्ष आश्विन त्रिमल आणि पीडीसीसीचे सदस्य हर्निश राजा यांनी सांगितले की, हि स्पर्धा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत असून एकूण 30,000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने 9 फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. यामध्ये 11 वर्षाखालील खुल्या गटात 175खेळाडू, तर मुलींच्या गटात 65खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. यावेळी पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, एमसीएचे मानद सचिव निरंजन गोडबोले, चीफ आरबीटर दिप्ती शिदोरे, नितीन शेणवी आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
स्पर्धेत पुणे, मुंबई सिटी, मुंबई उपनगर, यवतमाळ, नागपुर, रायगड, अमरावती, चंद्रपूर, अहमदनगर, सोलापूर, पालघर, ठाणे, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, अकोला, जालना, बीड, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली या शहरातून 240 खेळाडू सहभागी झाले असल्याचे आश्र्विन त्रिमल यांनी सांगितले.
 
स्पर्धेतील मानांकित खेळाडूंमध्ये खुल्या गटात शौनक बदोले (नागपुर,1581), अविरत चौहान(पुणे, 1436), आर्यन वाघमारे(ठाणे, 1394), विराज राणे (मुंबई उपनगर, 1391), अद्विक अग्रवाल (पुणे, 1384) यांनी, तर मुलींच्या गटात अव्वल मानांकित वेदिका पाल(नागपुर,1456), माईशा परवेझ(मुंबई उपनगर,1311), अन्वी हिरडे(नागपुर,1200), स्वधा दातिर(यवतमाळ,1186), त्वेशा जैन(मुंबई शहर, 1167)यांचा समावेश आहे. 
 
स्पर्धेतील खुल्या व मुलींच्या गटातील अव्वल दोन खेळाडूंची निवड आगामी आंध्रप्रदेश येथे 1 ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार असून हे खेळाडू या स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे हर्निश राजा यांनी नमुद केले.