May 18, 2024

बुद्धिबळाकडे एक उपचार पद्धती म्हणून बघण्याची गरज – विवेक वेलणकर

पुणे दि. १४ जुलै, २०२३ : कोविडनंतरच्या काळात अबालवृद्धांमध्ये मानसिक ताणतणाव, अस्थिरता यामध्ये खूप वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढलेली चंचलता, बैठकीचा अभाव, अभ्यासातील एकाग्रता ढळणे अशा गोष्टी वाढल्याच्या तक्रारी पालक व शिक्षक सातत्याने करत आहेत या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये स्थिरता, एकाग्रता वाढवण्यासाठी ‘चेस थेरपी’ अर्थात बुद्धिबळ उपचारपद्धती सारख्या आगळ्यावेगळ्या उपचाराची आवश्यकता ही आज काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन शिक्षण तज्ज्ञ विवेक वेलणकर यांनी केले.

विवेक वेलणकर यांच्या हस्ते वेलणकर चेस इन्स्टिट्यूटच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या ‘चेस थेरपी’ या नवीन संकल्पनेचे उद्घाटन नुकतेच पत्रकार संघ येथे संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. बुद्धिबळ प्रशिक्षक व वेलणकर चेस इन्स्टिट्यूटचे संचालक मकरंद वेलणकर, ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचे वडील प्रकाश कुंटे आणि बुद्धिबळ प्रशिक्षक सोनम ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमाची संकल्पना कशी सुचली हे सांगताना मकरंद वेलणकर म्हणाले, “मानसिक आरोग्य सशक्त असले की स्वाभाविकच आपल्या बाकी क्रियांवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. शिवाय मी जिंकू शकतो या आत्मविश्वासयुक्त उमेदीने आपण यशाची वाटचाल अधिक गतीने करू शकतो, असे मला वाटते. यासाठीच चेस थेरपी ही मानसिक आरोग्य संपन्न ठेवायला उपयोगी ठरणार थेरपी आहे. अनेक पालकांचे असे म्हणणे असते की मुले हट्टी, चंचल, हायपर ॲक्टिव्ह आहेत. बैठक कमी असल्यामुळे जेवढी हुशारी आहे ती पूर्ण वापरली जात नाही. तर अनेक मुलांना एक प्रकारचा नर्व्हसपणा असतो, निगेटिव्ह विचारसरणी, येणारे नैराश्य, वाढलेला स्क्रीन टाईम यामुळे पाल्याविषयी पालकांच्या मनात काळजी दाटलेली असते. स्लो लर्नर, जिद्दीचा अभाव यातून पाल्याला कसे बाहेर काढायचे याची चिंता अनेक पालकांना भेडसावत असते. या आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टींवर चेस थेरपी उपयुक्त ठरू शकते.”

याबरोबरच ताणतणाव, कामाचे प्रेशर यातून मार्ग शोधायला देखील चेस थेरपीचा प्रभावी उपयोग होऊ शकतो. बुद्धिबळ खेळाच्या सरावाने तुम्ही विस्मृती या दोषाला दूर ठेवू शकता. विशेषतः जेष्ठांना यासाठी चेस थेरपीचा चांगला उपयोग होऊ शकतो. असेही मकरंद वेलणकर म्हणाले.

ही थेरपी कशी असेल याबद्दल अधिक माहिती देताना सोनम ठाकूर म्हणाल्या, “मूळात खेळाडू घडविण्यासाठी ही थेरपी नसून याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व व्यक्तीमत्त्व विकास यावर आमचा भर असणार आहे. चेस थेरपीसाठी येणा-या प्रत्येक केससाठी योग्य असा प्लॅन म्हणजेच त्याला उपयुक्त अशा पद्धतीने बुद्धिबळ शिकवायचे याचे कोर्सवर्क आम्ही तयार केले आहे. यामध्ये चेस थेरपीची मांडणी तीन महिन्याचा एक कोर्स अशा तीन टप्यात केली आहे. पुढे आवश्यकता भासल्यास हा काळ आपल्याला वाढवता देखील येतो.”

प्रत्यके व्यक्ती ही बुद्धिबळ साक्षर व्हावी हा आमचा ध्यास असून या खेळाद्वारे स्वत:तील त्रुटी दूर करण्याच्या दिशेने विद्यार्थ्यांचा प्रवास आम्ही आखणार आहोत, असेही ठाकूर यांनी नमूद केले.

चेस थेरपीची कल्पना मांडणारे मकरंद वेलणकर हे गेली तीस वर्षे बुद्धिबळ प्रशिक्षक, संयोजक, प्रसारक अशा विविध भूमिकांमधून कार्यरत आहेत. ‘मुले, कुटुंब व समाज यांवर बुद्धिबळाचा होणारा चांगला परिणाम’ या विषयावर मकरंद वेलणकर यांनी एम फिल केले आहे. या सगळ्या अनुभवातून त्यांनी चेस थेरपीचे विशेष मॉडेल तयार केले आहे. तर त्यांच्या सहकारी असलेल्या सोनम ठाकूर या बुद्धिबळ प्रशिक्षक तसेच स्टेट आर्बिटर असून एमसीएच्या चेस इन स्कूल उपक्रमाच्या अधिकृत कोच आहेत.