April 25, 2026

उपमहापौर करंडक ट्रॅकनाईटस राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत 739 खेळाडू सहभागी

पुणे, 23 एप्रिल 2026: ॲथलेटिक्स स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने व पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आणि महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना यांच्या सहकार्याने आयोजित उपमहापौर करंडक ट्रॅकनाईटस राज्य अजिंक्यपद ॲथलेटिक्स स्पर्धेत राज्यभरातून 739 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही मैदानी स्पर्धा 24 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान पुण्यात सणस मैदान, येथे प्रकाशझोतात होणार आहे.

संयोजन सचिव चिराग पटेल म्हणाले की, स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली, जळगाव, कोल्हापूर, संभाजीनगर या ठिकाणाहून 739 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. मुंबई येथे 2020 आणि 2025 यावर्षी तर नाशिक येथे 2023 व 2024 अशा दोन वर्षी प्रकाश झोतातील स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्यानंतर ट्रॅकनाईट्स यांनी हा चित्त थरारक अनुभव पुणे करांसाठी यावर्षी आणला असून राज्य मैदानी अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यातील क्रीडाप्रेमींना अनुभव घेता येणार आहे.

एकूण तीन दिवस चालणारी ही स्पर्धा 8, 10, 12, 14, 16, 18 वर्षाखालील आणि खुल्या गटात पार पडणार आहे. स्पर्धेत उंच उडी, 60मी, 300 मी, 800मीटर धावणे, लांब उडी, थाळीफेक, भालाफेक, 120मीटर अडथळा शर्यत, 4×100 मीटरमिडले शर्यत, शॉट पुट अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

युवा ॲथलिटना आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्पर्धात्मकतेचा अनुभव राज्यस्तरीय स्पर्धांच्या व्यासपीठापासूनच देण्यासाठीचा ट्रॅकनाईटसचा प्रयत्न आहे. प्रकाश झोतात होणारी स्पर्धा व्यावसायिक दर्जाचे इलेक्ट्रॉनिक टाइमिंग बोर्ड आणि संपूर्ण सादरीकरण यामुळे खेळाडूंची कामगिरी आणि आत्मविश्वास उंचावणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीतील हा एक संस्मरणीय अनुभव ठरावा अशी आमची संयोजक म्हणून इच्छा आहे.