पुणे, १४ एप्रिल २०२६ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे. बोपोडी परिसरात उभारण्यात आलेली महाबोधि विहार, बोधगया येथील विहाराची तब्बल ४० फूट उंच प्रतिकृती नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
या देखाव्याचे उद्घाटन भन्ते नागघोष यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित भिक्षू संघांनी बौद्ध मंत्रोच्चार करून वातावरण भक्तिमय केले. मोठ्या संख्येने नागरिकांनी या देखाव्याला भेट देत अभिवादन केले.
ही भव्य प्रतिकृती पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर आणि माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे. आकर्षक प्रकाशयोजना, देखणी सजावट आणि सूक्ष्म कलाकुसरीमुळे या प्रतिकृतीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. उद्घाटन प्रसंगी रिपाईचे शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्ष अविनाश कदम, नगरसेवक सनी निम्हण, सपना छाजेड, भक्ति गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.
आंबेडकर जयंतीनिमित्त बोपोडी परिसरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या भव्य देखाव्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून महाबोधि विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे, त्याला पाठिंबा देण्यासाठी ही भव्य प्रतिकृति उभारली आहे. तसेच या प्रतिकृतीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजूषा नागपुरे भेट देणार असल्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले.

More Stories
पवना धरण ९९ टक्के भरले; विसर्ग वाढणार, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – महापालिकेचे आवाहन
NEET 2026 मध्ये अखिल भारतीय स्तरावर 498 वा क्रमांक मिळवणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या कन्या अतुल्या डोंगरे यांचा महापौरांकडून गौरव..
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी