August 11, 2026

पवना धरण ९९ टक्के भरले; विसर्ग वाढणार, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – महापालिकेचे आवाहन

पिंपरी, ३१ जुलै २०२६ : पवना धरण ९९ टक्के भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पवना धरणातून सध्या नदीपात्रात ७,८८० क्युसेक विसर्ग सुरू असून, धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा विसर्ग वाढवून ९,२०० क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने १५,००० क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असून नदीच्या सखल भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पवना नदी परिसरातील नागरिकांनी नदीपात्रात अथवा नदीकाठी जाणे टाळावे. नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालये, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग तसेच संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. सखल भागांमध्ये ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेचे संदेश प्रसारित करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहने व निवारा केंद्रांची तयारी करण्यात आली आहे. अग्निशमन दलाला सर्व साधनांसह सुसज्ज राहून कोणतीही घटना घडल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित मदतकार्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पोलीस प्रशासन, स्थानिक यंत्रणा आणि सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच जलसंपदा विभाग, जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास संबंधित प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.