पुणे, १७ एप्रिल २०२६: आशिया ओशानिया बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे भारतात तब्बल पाच वर्षानंतर पुनरागमन होत असून या स्पर्धेच्या आयोजनाचा मान पुणे शहराला मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित येत्या २० ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर पार पडणाऱ्या या स्पर्धेत आशियांतील उत्कृष्ट युवा टेनिसपटूंचे कौशल्य पाहण्याची संधी पुणेकर टेनिसपटूंना मिळणार आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव व स्पर्धा संचालक सुंदर अय्यर आणि डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव डॉ. विक्रांत साने यांनी सांगितले की, पुण्यात सहाव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून डेक्कन जिमखाना येथे दुसऱ्या वर्षी हि स्पर्धा होत आहे. आशियांतील इतर राज्यांमध्ये हि स्पर्धा घेण्यास चुरस असताना महाराष्ट्राला या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाला यासाठी आशियाई टेनिस संघटना आणि अखिल भारतीय टेनिस संघटना यांचे आम्ही आभारी आहोत.
स्पर्धेत आशिया ओशानिया भागातील 15देशातील खेळाडूंमध्ये (ऑस्ट्रेलिया, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, सिंगापूर, हाँगकाँग, चीन, कझाकस्तान आणि भारत) या ठिकाणांचा समावेश आहे. कुमार ग्रँड स्लॅम स्पर्धेनंतर जगातील हि दुसऱ्या दर्जाची अजिंक्यपद स्पर्धा असून या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावरील खेळाडूंशी स्पर्धा करण्याची आणि 300 आयटीएफ गुण मिळवून आपल्या आंतरराष्ट्रीय मानांकनात सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय या आशियाई स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला आगामी वर्षात होणाऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत थेट प्रवेश मिळण्यास पात्र ठरण्याची संधीदेखील मिळणार असल्याचे अय्यर यांनी सांगितले.
तसेच, हि स्पर्धा आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ), अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए) आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या मान्यतेखाली होत असून सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा प्रत्येक गटातील ड्रॉ हा 32चा असणार असून अव्वल 22 खेळाडूंना(आयटीएफ मानांकनाच्या आधारावर) थेट मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश मिळणार आहे आणि इतर खेळाडू पात्रता फेरीतून व वाईल्डकार्ड द्वारे प्रवेश करणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 300 गुण तर, उपविजेत्या खेळाडूला 210 गुण देण्यात येणार आहेत. तसेच, 32खेळाडूंमध्ये प्रवेश करणाऱ्या खेळाडूंना 30 गुण देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील निरुपमा मंकड, संदीप कीर्तने, ईशा लखानी, ऋतुजा भोसले, मिहिका यादव, सिद्धांत भाटिया आणि मानस धामणे यांनी याआधी या आशियाई कुमार टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकाविले आहे. आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री लीना नागेशकर यांची आयटीएफ सुपरवायझर म्हणून निवड करण्यात आली आहे.
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
मुले: 1.ह्यु कावनिशी (जपान, 37), 2. अर्णव पापरकर(भारत, 45), 3. कुनानन पँटारटोर्न(थायलंड, 58), 4. जेक डेम्बो(ऑस्ट्रेलिया, 72),
5. मिन ह्युक चो (कोरिया, 77), 6. कूपर कोसे(ऑस्ट्रेलिया, 92), 7. निकोलस बेकर(ऑस्ट्रेलिया, 106), 8. आराध्या खिस्तीज(भारत,109)
मुली: 1.रियो योशिदा(जपान,77), 2.मैलुओदी लेई(चीन, 101), 3.जिझेल सिबाई(ऑस्ट्रेलिया, 121), 4. मिकू किटाओका(जपान, 127),
5.साकिनो मियाझावा(जपान, 128), 6. सियोएन सिम (कोरिया, 131), 7. दिया रमेश रमेश(भारत, 170), 8. अल्बिना काकेनोवा(कझाकस्तान, 203)

More Stories
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत जीओजी एफसी, सीएमएस फाल्कन्स, थंडरकॅट्ज एफसी यांचे सनसनाटी विजय
पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026स्पर्धेत जीओजी एफसी, परशुरामियन्स एससी संघांचे विजय
चौथ्या द पूना क्लब स्विमिंग लीग 2026 स्पर्धेत गतविजेत्या एएसआर डॉल्फिन्स संघाला विजेतेपद