पुणे, २७ एप्रिल २०२६ : एरंडवण्यातील पटवर्धन बागेतील टँकर भरणा केंद्रात गंभीर अनियमितता समोर आली असून, प्रत्यक्षात ५० टँकर भरले जात असताना नोंद मात्र केवळ १८ टँकरचीच करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मोफत टँकर योजनेत मोठा “झोल” असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.
आज या टँकर पॉईंटची पाहणी केली असता येथील पाणी मीटर १६ डिसेंबर २०२५ पासून बंद असल्याचे आढळले. या केंद्रातून प्रभाग क्रमांक १०, ११, २९, ३०, ३१, ३२ आणि ३३ या मोठ्या भागाला मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र मीटरच बंद असल्याने नेमके किती टँकर भरले गेले आणि किती पाणी वितरित झाले, याचा अचूक हिशोब ठेवला जातो का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी यापूर्वीच गुप्त रेकॉर्डिंगच्या आधारे हा प्रकार उघड केला होता. त्यात रजिस्टरमध्ये १८ टँकरची नोंद असताना प्रत्यक्षात तब्बल ५० टँकर भरले गेल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर सर्व टँकर पॉईंटवर मीटर बसविण्यात आले होते. मात्र आता तेच मीटर महिनोनमहिने बंद असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय, टँकरद्वारे पाणी पुरवठा झाल्यानंतर संबंधित सोसायटी किंवा वस्तीतील नागरिकांची कोणतीही सही किंवा पोचपावती नोंदवली जात नसल्याची गंभीर त्रुटीही निदर्शनास आली आहे. त्यामुळे मोफत पाणीपुरवठा खरोखरच संबंधित ठिकाणी पोहोचतो का, याबाबत शंका निर्माण होत आहेत.
या सर्व प्रकरणाची तातडीने चौकशी करून, शहरातील सर्व टँकर पॉईंटची पाहणी करावी, बंद मीटर तत्काळ सुरू करावेत आणि प्रत्येक टँकर डिलिव्हरीनंतर संबंधितांची सही अनिवार्य करावी, अशी मागणी खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
तसेच, कोणत्या कारणाने आणि कोणाच्या निर्देशावरून मोफत टँकर पाठविण्यात येतो याची नोंद ठेवणे बंधनकारक करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात २४x७ पाणीपुरवठा योजनेतही अशाच प्रकारचे गैरप्रकार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

More Stories
Pune: पथारी व्यावसायिकांसाठी अभय योजनेचा प्रस्ताव
शिवरायांचा अपमान; सरकार गप्प! बागेश्वर बाबाविरोधैत काॅंग्रेसचे आंदोलन
Pune: नदीकाठ प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश