June 26, 2026

प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजन

पुणे, ता. 26/06/2026: दी प्रोफेशनल रियल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) आणि नॅशनल असोसिएशन ऑफ रियल्टर्स-इंडिया (नार-इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ या देशातील सर्वात मोठ्या एकदिवसीय रियल इस्टेट सल्लागार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद रविवार, ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हॉटेल जेडब्ल्यू. मॅरिएट, पुणे येथे होणार आहे. देशातील ३८ शहरांतील दोन हजारांहून अधिक रियल्टर्स आणि ३०० हून अधिक विकसक सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘प्रॉप’चे अध्यक्ष उदयन माने आणि ‘प्रॉप कनेक्ट २०२६’चे संयोजक रमेश तोष्णीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष दर्शन चावला, तनुज नगरानी (उपाध्यक्ष – बिल्डर रिलेशन्स अँड स्पॉन्सरशिप), नीरज सिंग (उपाध्यक्ष – टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन), मनीष दीडमिसे (सचिव), मुरली रमनी (खजिनदार), दिनेश राठी (संचालक – ट्रेनिंग अँड मेंबरशिप सर्कल), सारंग मद्रेवार (संचालक – स्पोर्ट्स अँड कल्चरल फंक्शन्स), महेश यादव (संचालक – प्रॉप ग्रोथ), रवींद्र यादव (संचालक – डिजिटल पीआर/मीडिया), विक्रम मलिक (संचालक – बिझनेस एक्स्चेंज अँड क्रॉस सेल) आणि प्रीत कोहली (संचालक – इव्हेंट्स, एंगेजमेंट अँड नेटवर्किंग) उपस्थित होते.

उदयन माने म्हणाले, ‘रियल्टर्स – फ्युएलिंग द फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेत रियल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ, विकसक, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार आहेत. नेटवर्किंग, ज्ञानविनिमय आणि व्यवसायवृद्धीसाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. प्रॉप कनेक्ट २०२६ हा रियल्टर समुदायाच्या कार्याचा गौरव करणारा आणि देशातील संघटित रियल इस्टेट क्षेत्राला एकत्र आणणारा उपक्रम आहे. पुण्याच्या भविष्यातील विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, उद्योजकता आणि व्यवसाय विस्तार यांसारख्या विषयांवर परिषदेमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

रमेश तोष्णीवाल म्हणाले, “पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी पुण्याच्या पुढील विकासाच्या दिशेबाबत व्याख्यान देणार आहेत. तसेच ‘द पंचशील स्टोरी’ या विशेष संवादामध्ये अतुल चोरडिया सहभागी होणार असून, ‘स्टोरी ऑफ द टायटन्स’ या सत्रात देशातील आघाडीचे विकसक रियल इस्टेट क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकही विविध चर्चासत्रांत सहभागी होणार आहेत.”

दर्शन चावला यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन या विषयावर वैभव सिसिंटी, तर सीए सार्थक आहुजा २०२७ मधील रियल इस्टेट बाजारपेठेचा आढावा सादर करणार आहेत. राजीव तलरेजा व्यवसाय विस्तारावर मार्गदर्शन करणार असून, विनोदी कलाकार विपुल गोयल यांच्या कार्यक्रमाने परिषदेची सांगता होईल. याशिवाय सीएसआर उपक्रम, भागीदारांचा गौरव आणि गाला डिनरचेही आयोजन करण्यात आले आहे.

तनुज नगरानी यांनी सांगितले की, रिअल्टर्स आणि विकसक यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करणे आणि उद्योगातील नव्या संधींबाबत मार्गदर्शन करणे हा परिषदेचा उद्देश आहे. ३०० हून अधिक विकसक आणि भागीदारांचा सहभाग हा संघटित रिअल्टर चळवळीला मिळालेल्या पाठिंब्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.