पुणे, २६ जून २०२६ : जन्म व मृत्यू दाखल्यांमधील दुरुस्तीची प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून ठप्प झाल्याने हजारो नागरिकांची कामे रखडली आहेत. यात प्रशासन हातावर हात ठेवून शांत आहे. अखेर या विषयात स्थायी समितीने लक्ष घालते आहे. जन्म व मृत्यू दाखल्याच्या दुरूस्ती, नाव बदल यातील अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हे अधिकारी नागरिकांच्या तक्रारी ऐकून मार्गदर्शन करणार आहेत.
जन्म मृत्यू दाखल्यात दुरूस्ती करण्याचे अधिकार काढून घेतल्याने नागरिकांचे हाल होत असल्याने स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आला.
जन्मतारीख, नाव, पालकांची नावे, लिंग अथवा स्पेलिंगमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना अनेक दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित राहिल्याने शैक्षणिक प्रवेश, पासपोर्ट, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच विविध शासकीय कामांवर परिणाम झाला आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल केल्या तरी त्यावर प्रशासनाकडून तोडगा काढला जात नाही. तसेच नागरिकांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही.
श्रीनाथ भिमाले म्हणाले, ‘‘जन्म मृत्यू दाखल्यातील दुरुस्तीचे काम होत नसल्याने नागरिकांना
अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रलंबित अर्जांची माहिती, सॉफ्टवेअरमधील त्रुटी, जुन्या नोंदींच्या डिजिटायझेशनची स्थिती आणि शासन स्तरावरील पाठपुराव्याचा अहवाल प्रशासनाने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज ट्रॅकिंग, अतिरिक्त मनुष्यबळ आणि विशेष मोहीम राबवून प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दाखल्यांमधील दुरुस्तीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळावेत यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, हा विषय विधिमंडळातही मांडला जाणार असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले. नागरिकांना वेळेत सेवा मिळावी आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

More Stories
राजगड ट्रेकला निघालेल्या पर्यटकांच्या वाहनाला अपघात; दोघांचा मृत्यू
पुण्यात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजन