पुणे, २७ जून २०२६ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीत रविवार (दि. २८ जून) ते ३ जुलैदरम्यान राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सुमारे ३ लाख १६ हजार २७५ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ५४ दवाखाने, १९ प्रसूतिगृहे आणि ६५ आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून शहरात १,३७५ पोलिओ बूथ उभारण्यात येणार आहेत. याशिवाय वीटभट्ट्या, स्थलांतरित वस्त्या, बांधकामस्थळे आणि अतिजोखमीच्या भागांमध्ये विशेष पथके कार्यरत राहणार आहेत. २९ जून ते ३ जुलैदरम्यान १,९९० पथके घरोघरी जाऊन प्रत्येक बालकाने पोलिओचा डोस घेतल्याची खात्री करणार आहेत.
मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून शहरातील बालकांचे सर्वेक्षण करून यादी अद्ययावत करण्यात आली आहे. प्रवासात असलेल्या बालकांसाठी बसस्थानके, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके आणि विमानतळावरही ट्रान्झिट पथके तैनात करण्यात येणार आहेत.
आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे की, बालकाला यापूर्वी पोलिओचे सर्व डोस दिले असले तरी रविवार, २८ जून रोजी अतिरिक्त पोलिओ डोस अवश्य द्यावा.

More Stories
डीजे बंदीवरून गणेश मंडळांचा गोंधळ; सत्ताधारी, प्रशासनाची नमती भूमिका!
पश्चिम पुण्यासह शहराच्या विविध भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद
४० शाळांमधील ६३० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रतिकृती तयार करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद केली