पुणे, २८ जून २०२६ : राजगड किल्ला पाहण्यासाठी मुंबईतील एका खासगी कंपनीतील २२ जण रविवारी पहाटे सुमारे २ वाजता पाबे घाट मार्गे वेल्हेकडे जात असताना त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. पाबे गावाजवळील शेवटच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने सुरक्षा कठडा तोडला आणि सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळून एक पलटी घेतली. या दुर्घटनेत चालक जखमी असून, दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले.
मृतांमध्ये विश्वास बाबुराव सतीम (वय २५) आणि ध्वनी चंद्रेश ठक्कर (वय २३) यांचा समावेश आहे. अपघातानंतर संदीप तुकाराम गायकवाड, चालक गाडीखाली दबला गेला होता, तर ध्वनी ठक्कर दोन सीटच्या मध्ये अडकल्याने तिचा घटनास्थळी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे अधिकारी निलेश राणे यांनी वेल्हे पोलीस ठाणे आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळवले. त्यानंतर वेल्हे पोलिसांसह हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थांनीही बचावकार्यात मोलाची मदत केली.
बचावकार्यादरम्यान चालक वाहनाखाली अडकलेला असल्याचे निदर्शनास आले. त्याचा पाय सीटमध्ये अडकला होता आणि वाहन झाडावर अडकल्याने त्याच्यावर मोठा भार होता. तसेच वाहनातून डिझेल गळत असल्याने आणि इग्निशन सुरू असल्यामुळे आग लागण्याचा धोका निर्माण झाला होता.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेस्क्यू टीमने जेसीबीच्या सहाय्याने दोरी लावून वाहन किंचित उचलले. त्यानंतर एका बचाव कर्मचाऱ्याने वाहनात शिरून सीट बेल्ट कापला, सीटचे कुशन काढून चालकाचा अडकलेला पाय मोकळा केला. त्याचबरोबर शरीराखालील माती काढून जागा निर्माण करण्यात आली आणि चालकाला बाहेर काढण्यात आले.
अपघातातील सर्व जखमींना तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. मृत दोघांचे मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टर भुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींवर उपचार सुरू असून अपघाताची पुढील चौकशी पोलीस करत आहेत.

More Stories
पुण्यात रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ पुणेतर्फे (प्रॉप) ‘प्रॉप कनेक्ट २०२६’ राष्ट्रीय परिषदेचे ६ जुलैला आयोजन
जन्म मृत्यू दाखला गोंधळावर महापालिका जागी